मानोरा(Manora):- तालुक्यातील बोरव्हा ते कार्ली रस्त्याचे झालेले काम निकृष्ट दर्जाचे(Poor quality) करण्यात आले असुन उर्वरित राहिलेले काम गिट्टा टाकून अपूर्ण ठेवले असल्याने वाहन धारकांना ये – जा करतांना कसरत करावी लागत आहे. त्यामुळे सदरील झालेल्या रस्ता कामाची पाहणी करून चौकशी व अर्धवट काम पूर्ण करण्याचे आदेश कंत्राटदार यांना देवून शाखा अभियंता व कंत्राटदार यांच्यावर कडक कार्यवाही करावी, असे निवेदन अकोला येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक यांना ग्राम पंचायतचे सरपंच राजेश राठोड यांनी पाठविले आहे.
गिट्टावरून वाहन चालविणे कठीण झाले असुन दररोज गाड्या पंचर होत
निवेदनात नमूद केले आहे की, सार्वजनिक बांधकाम (Public works) उपविभाग मानोरा यांच्यावतीने बोरव्हा ते कार्ली रस्त्याचे कंत्राटदार यांची नेमणूक करून करण्यात आलेले अर्धवट काम निकृष्ट दर्जाचे करण्यात आले आहे. सदर करण्यात आलेल्या रस्त्याची साफसफाई न करता डांबरचा कमी वापर करून काम झाले आहे. उर्वरित काही रस्त्यावर कुठे १२ एम एम तर कुठे ४० एम एम गिट्टा टाकलेला आहे. सदर टाकलेला गिट्टा उखडला आहे. त्या गिट्टावरून वाहन चालविणे कठीण झाले असुन दररोज गाड्या पंचर होत आहेत. सदरील रस्त्याचे काम नियमाला बगल देऊन होत असल्याने सदरील रस्त्याची चौकशी करून दोषींवर कार्यवाही करावी, असे अधिक्षक अभियंता यांना पाठविलेल्या निवेदनाद्वारे कळविले आहे. निवेदनाच्या प्रतीलिपी सा. ब. विभागाचे कार्यकारी अभियंता, उपविभागीय अभियंता यांना पाठविल्याचे निवेदनात नमूद केले आहे.
संबंधित विभागाचे शाखा अभियंता व कंत्राटदार यांनी कमीशन कमावण्याच्या नादात रस्ता व डांबरीकरणाचे काम शासनाच्या अंदाज पत्रकाला डावलून करीत आहे. याबाबत वरीष्ठ स्तरावरून चौकशी करून संबंधित दोषींवर फौजदारी कार्यवाही करावी तसेच चौकशी केल्याशिवाय देयके अदा करण्यात येवू नयेत. असे तक्रार निवेदनाद्वारे कळविले आहे