परभणी (Parbhani):- सध्या जिल्ह्यात अपघातामध्ये मृत्यू पडण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यात ऊसाचे ट्रॅक्टर हे मुख्य कारण ठरत असल्याने ट्रॅक्टर हे सर्वसामान्यांचे बळी घेत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे महामार्ग पोलीस व उप प्रादेशिक परिवहन कार्यालय यांनी रिफ्लेक्टर नसणार्या व अनफिट असलेल्या ट्रॅक्टरवर कारवाई करण्याची मागणी जनसामान्यांतून होत आहे.
पोलिसांची रात्रीची गस्त वाढविणे गरजेचे
मागील काही दिवसांपासून ऊसाचे कारखाने(Sugarcane factories) सुरू झाले असून ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर व इतर वाहने रस्त्यावर दिसत आहेत. हे वाहतूक करणारे ट्रॅक्टर रात्रीच्या वेळी ऊस वाहतूक करत असतात या ट्रॅक्टरला रिफ्लेक्टर नसल्याने व दोन ट्रॉली लावलेली असल्याने मागुन येणार्या वाहनांना ट्रॅक्टर असल्याचा अंदाज घेता येत नाही. कित्येक ट्रॅक्टरमध्ये बिघाड झाल्यानंतर ते रस्त्यावरच उभे राहिलेले आढळून येतात. तसेच ट्रॅक्टर चालक ट्रॅक्टरवर गाण्यांचा आवाज मोठा करुन ऊसाची वाहतूक करतो. त्यामुळे मागुन येणार्या वाहनांचा आवाज त्याला येत नाही. अशा अनेक कारणांमुळे ऊसाच्या ट्रॅक्टरमुळे अपघाताचे प्रमाण वाढताना दिसत आहे.
परभणीत ऊसाचे ट्रॅक्टर घेतात सर्वसामान्यांचे बळी
मागील काही दिवसात ऊसाच्या ट्रॅक्टरमुळे अपघात होऊन काही जणांना प्राण गमवावे लागले आहेत. त्यामुळे ऊसाचे ट्रॅक्टर हे सर्वसामान्यांचे बळी घेत असल्याची धारणा होत आह. उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अश्विनी स्वामी यांनी ट्रॅक्टरला रिफ्लेक्टर लावण्याची मोहिम चालू केली आहे. परंतु सामान्य जनतेमधून रिफ्लेक्टर नसणार्या वाहनांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. तसेच वाहन चालकाचा परवाना व ट्रॅक्टरचे फिटनेस देखील तपासणे गरजेचे आहे.