मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासह SIR प्रक्रिया रद्द करण्याची मागणी; आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेण्याची शक्यता
दिल्लीतील राजकीय वातावरण तापले असून, निवडणूक आयोगाविरोधातील आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी काँग्रेससह INDIA आघाडीतील नेत्यांमध्ये हालचाली वाढल्याचे चित्र आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी उद्धव ठाकरे, तेजस्वी यादव, ममता बॅनर्जी यांच्यासह आघाडीतील प्रमुख नेत्यांशी संपर्क साधल्याचे वृत्त आहे. गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमधील संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. आता या आंदोलनाबाबत राहुल गांधी कोणती पुढील रणनीती आखतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
काँग्रेस आणि INDIA आघाडीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी तसेच विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रिया (SIR) रद्द करण्याचा मुद्दा आक्रमकपणे उपस्थित केला आहे. विरोधक आंदोलन मागे घेण्याच्या भूमिकेत नसल्याचे दिसत असताना, केंद्र सरकारकडून अद्याप आंदोलनावर थेट प्रतिक्रिया आलेली नाही. दुसरीकडे, भाजपच्या नेत्यांकडून विरोधकांवर टीका सुरू आहे.
राहुल गांधींच्या पुढील रणनीतीकडे लक्ष
निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात काँग्रेसने आंदोलनाची भूमिका घेतली आहे. गेल्या तीन दिवसांपासून दिल्लीतील संसदेच्या परिसरात आंदोलन सुरू असून, ते किती काळ चालणार याबाबत अद्याप स्पष्टता नाही. आंदोलनासाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली आहे. तसेच ज्ञानेश कुमार यांनी माफीचे साक्षीदार व्हावे, अशी मागणीही त्यांनी पुढे केली आहे.
आंदोलनाच्या पहिल्या दिवशी INDIA आघाडीतील १९ घटक पक्षांच्या खासदारांनी रस्त्यावर उतरून एकजूट दाखवली होती. मात्र, त्यानंतरच्या आंदोलनात काँग्रेसचे नेते आणि खासदार अधिक सक्रिय दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर घटक पक्षांची साथ कायम ठेवणे आणि आंदोलनाला व्यापक पाठिंबा मिळवणे, हे काँग्रेससमोरील महत्त्वाचे आव्हान मानले जात आहे.
आंदोलनाची दिशा आणि कालावधी अद्याप स्पष्ट नसताना, घटक पक्षांमध्ये संभ्रम निर्माण झाल्याची चर्चा आहे. अशा परिस्थितीत राहुल गांधी यांनी उद्धव ठाकरे, तेजस्वी यादव, ममता बॅनर्जी आणि इतर प्रमुख नेत्यांशी संपर्क साधल्याचे वृत्त समोर आले आहे. या संवादातून आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे मानले जात आहे. दरम्यान, हॉटेलमधील डिनर डिप्लोमसीचीही राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.
आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेणार?
दरम्यान, INDIA आघाडीचे खासदार आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेण्याची शक्यता आहे. राष्ट्रपती भवनाकडून आघाडीच्या १० सदस्यीय शिष्टमंडळाला भेटीसाठी वेळ देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
या संभाव्य भेटीदरम्यान विरोधकांकडून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी मांडली जाऊ शकते. त्याचबरोबर SIR प्रक्रियेबाबतचे आक्षेप आणि या प्रक्रियेमुळे निर्माण झालेल्या प्रश्नांकडेही राष्ट्रपतींचे लक्ष वेधले जाण्याची शक्यता आहे.
दिल्लीतील आंदोलनाचा आज चौथा दिवस असून, विरोधकांची पुढील भूमिका काय असेल आणि या आंदोलनावर केंद्र सरकार काय प्रतिसाद देते, हे महत्त्वाचे ठरणार आहे. राहुल गांधी यांच्याकडून घटक पक्षांशी साधला जाणारा संवाद, राष्ट्रपतींसोबत संभाव्य भेट आणि निवडणूक आयोगाविरोधातील मागण्या यामुळे राजधानीतील राजकीय घडामोडींना वेग आला आहे.