केरळचे गृहमंत्री रमेश चेन्निथला यांचे प्राथमिक चौकशीचे आदेश; कंत्राटदार साजन यांच्या जुन्या तक्रारीनंतर VACB करणार तपास
देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याशी संबंधित दोन दशकांपूर्वीच्या कथित लाचखोरी प्रकरणाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. केरळमधील सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव असताना त्यांनी दोन कोटी रुपयांची लाच मागितल्याचा आरोप एका कंत्राटदाराने केला होता. या जुन्या तक्रारीची आता नव्याने दखल घेण्यात आली असून, केरळचे गृहमंत्री रमेश चेन्निथला यांनी प्राथमिक चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यानुसार व्हिजिलन्स अँड अँटी करप्शन ब्युरो (VACB) या प्रकरणाची तपासणी करणार आहे.
हे प्रकरण केरळ स्टेट ट्रान्सपोर्ट प्रोजेक्टशी संबंधित आहे. साजन नावाच्या कंत्राटदाराने ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात लाच मागितल्याची तक्रार केली होती. त्यावेळी कुमार केरळच्या सार्वजनिक बांधकाम विभागात सचिवपदावर कार्यरत होते. आता या तक्रारीतील आरोपांची सत्यता तपासली जाणार आहे.
१७ कोटींचे बिल मंजूर, तरीही चेक मिळाला नसल्याचा दावा
तक्रारदार साजन हे केरळमधील कोल्लम जिल्ह्यातील चांदयामंगलम येथील रहिवासी होते. त्यांनी व्हिजिलन्स विभागाच्या संचालकांकडे सादर केलेल्या तक्रारीत रस्ते बांधकामाच्या देयकांबाबत गंभीर आरोप केले होते.
राज्यातील रस्त्यांचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतरही संबंधित कंपनीचे पैसे देण्यात आले नव्हते, असे साजन यांनी तक्रारीत नमूद केले होते. अभियंत्यांनी तब्बल १७ कोटी रुपयांच्या बिलाला मंजुरी दिली होती. मात्र, मंजुरी मिळूनही कंपनीला धनादेश देण्यात आला नसल्याचा दावा त्यांनी केला होता.
दोन कोटी रुपयांची लाच मागितल्याचा आरोप
साजन यांनी आपल्या तक्रारीत मलेशियाची कंपनी PATI-BEL आणि तिच्या कंत्राटदारांचा उल्लेख केला होता. कंपनीचे प्रोजेक्ट इंजिनिअर आणि मलेशियाचे नागरिक ली सी बीन यांनी ज्ञानेश कुमार दोन कोटी रुपयांची लाच मागत असल्याचे आपल्याला सांगितल्याचा दावा साजन यांनी केला होता.
कथितपणे दोन कोटी रुपये दिल्याशिवाय कंपनीला धनादेश मिळणार नसल्याचे सांगण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला होता. मात्र, लाच देऊन थकीत रक्कम मिळवण्यास कंपनीच्या अधिकाऱ्यांनी नकार दिला होता. काही रक्कम देऊन वाद संपवण्याचा पर्याय कंपनीतील काही व्यक्तींनी सुचवला होता; परंतु कंपनीने त्यास संमती दिली नसल्याचेही साजन यांनी म्हटले होते.
थकीत देयकांमुळे कंत्राटदार आणि कामगार अडचणीत
PATI-BEL कंपनीच्या कामाचे पैसे वेळेवर न मिळाल्याने संबंधित कंत्राटदार आणि मजुरांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागल्याचा उल्लेख तक्रारीत आहे. कामगार आणि कंत्राटदारांची थकबाकी भागवण्यासाठी ली सी बीन यांनी बंगळुरूमधील कंपनीच्या अन्य प्रकल्पासाठी उपलब्ध असलेल्या निधीचा वापर केल्याचा दावाही करण्यात आला होता.
एकीकडे देयके रखडली होती, तर दुसरीकडे कथित लाच मागितल्याचा प्रकार घडल्याने ली सी बीन यांच्यावर दबाव वाढत असल्याचे साजन यांनी नमूद केले होते. या घटनाक्रमानंतर २००६ मध्ये साजन यांनी आत्महत्या केली होती. त्यामुळे त्यांच्या मृत्यूमागील परिस्थिती आणि तक्रारीतील आरोप यांची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.
आत्महत्येपूर्वीच्या चिठ्ठीत ज्ञानेश कुमार यांच्या भूमिकेचा उल्लेख
साजन यांनी आत्महत्येपूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यामध्ये ज्ञानेश कुमार यांच्या कथित भूमिकेचा उल्लेख असल्याचे सांगितले जाते. या प्रकरणाची २००६ मध्येच चौकशी झाली होती. मात्र, लाचखोरीच्या कथित प्रकाराची प्रत्यक्ष माहिती असलेल्या व्यक्तींचे जबाब त्यावेळी नोंदवण्यात आले नव्हते, असा आक्षेप या चिठ्ठीत घेण्यात आल्याचे वृत्त आहे.
आता VACB कडून प्राथमिक चौकशी
जवळपास दोन दशकांपूर्वीच्या या प्रकरणाची आता पुन्हा चौकशी होणार आहे. केरळचे गृहमंत्री रमेश चेन्निथला यांच्या आदेशानंतर VACB कडून प्राथमिक तपास केला जाणार आहे. देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून ज्ञानेश कुमार यांच्या नावाची सध्या देशभरात चर्चा सुरू असतानाच या जुन्या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
दरम्यान, ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील कथित लाचखोरीची तक्रार आणि SIR म्हणजेच विशेष सखोल मतदार यादी पुनरावलोकन (Special Intensive Revision) ही दोन स्वतंत्र प्रकरणे आहेत. या लाचखोरीच्या आरोपांना अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. प्राथमिक चौकशी होणे बाकी असून, आरोपांची सत्यता तपासानंतरच स्पष्ट होणार आहे. या प्रकरणावर ज्ञानेश कुमार यांच्याकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.