योजना, अनुदान आणि खतवाटपात अडचणी येण्याची शक्यता
मुंबई/ वर्धा (Maharashtra Farmer ID) : राज्यातील सुमारे 29 लाख शेतकरी अद्याप फार्मर आयडी (शेतकरी ओळख क्रमांक) पासून वंचित असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना विविध शासकीय योजना, अनुदान आणि सवलतींचा लाभ मिळण्यात अडचणी निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. उर्वरित शेतकऱ्यांना फार्मर आयडी उपलब्ध करून देणे, हे आता शासकीय यंत्रणेसमोर मोठे आव्हान ठरत आहे.
शेतकऱ्यांसाठी आधार क्रमांकाप्रमाणेच फार्मर आयडी (Maharashtra Farmer ID) महत्त्वाचा मानला जात आहे. शेतजमीन स्वतःच्या नावावर असली, तरी विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी फार्मर आयडीची आवश्यकता भासणार आहे. त्यामुळे प्रत्येक पात्र शेतकऱ्याची या प्रणालीमध्ये नोंदणी होणे आवश्यक आहे.
फार्मर आयडीशिवाय योजनांचा लाभ मिळणार नाही?
शासनाने यापूर्वीच फार्मर आयडीशिवाय (Maharashtra Farmer ID) शेतकऱ्यांना शासकीय योजना आणि अनुदानांचा लाभ देऊ नये, असे निर्देश दिले आहेत. एकीकडे शासकीय कामकाजातील कागदपत्रांची संख्या कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे विविध योजनांसाठी स्वतंत्र नोंदणीची अट घातली जात असल्याने शेतकऱ्यांसमोर नवा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्यातील शेतकरी खातेदारांची संख्या सुमारे 1 कोटी 71 लाखांच्या आसपास आहे. त्यापैकी आतापर्यंत सुमारे 1 कोटी 41लाख शेतकऱ्यांना फार्मर आयडी देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. मात्र, अद्यापही मोठ्या संख्येने शेतकरी या नोंदणीपासून दूर आहेत.
वनपट्टेधारक शेतकऱ्यांचीही अपुरी नोंदणी
राज्यात वनपट्टेधारक शेतकऱ्यांची संख्या सुमारे 1 लाख 58 हजार आहे. त्यापैकी केवळ 67 हजार 508 शेतकऱ्यांना फार्मर आयडी (Maharashtra Farmer ID) क्रमांक देण्यात आल्याची माहिती आहे. उर्वरित वनपट्टेधारक शेतकऱ्यांची नोंदणी पूर्ण करण्याचे आव्हानही प्रशासनासमोर आहे. फार्मर आयडीमधील नोंदी आणि आवश्यक बदल करण्यासाठी दोन स्तरांवर सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मात्र, शेतकऱ्यांनी स्वतः शासकीय यंत्रणेशी संपर्क साधणे किंवा प्रशासनाने थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणे, हे दोन्ही पर्याय प्रत्यक्षात अडचणीचे ठरत आहेत. विशेषतः ग्रामीण आणि दुर्गम भागातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणे प्रशासनासाठी आव्हानात्मक बनले आहे.
पीएम किसान योजनेतील माहितीच्या आधारे नोंदणी
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून राज्य सरकारकडे उपलब्ध असलेल्या शेतकऱ्यांच्या माहितीचा (Maharashtra Farmer ID) फार्मर आयडी नोंदणीसाठी आधार घेतला जात आहे. मात्र, या योजनेतील सक्रिय लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या सुमारे 89 लाख 46 हजार असल्याचे सांगितले जाते. त्यानुसार यापैकी सुमारे 79 लाख शेतकऱ्यांनाच फार्मर आयडी देण्यात आल्याची माहिती आहे.
खत मिळवण्यासाठीही फार्मर आयडी आवश्यक
दरम्यान, राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचवण्यासाठी फार्मर आयडीचा आधार घेण्याबाबत मदत व पुनर्वसन विभागाकडून चाचपणी सुरू आहे. तसेच एकात्मिक खत व्यवस्थापन प्रणाली फार्मर आयडीशी जोडण्यात आली आहे. त्यामुळे (Maharashtra Farmer ID) फार्मर आयडी नसलेल्या शेतकऱ्यांना खत मिळवितानाही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. एकूणच, शासकीय योजनांचा लाभ, अनुदान आणि खतवाटपासाठी फार्मर आयडीचे महत्त्व वाढत असताना राज्यातील लाखो शेतकरी अद्याप या नोंदणीपासून दूर आहेत. त्यामुळे उर्वरित शेतकऱ्यांची नोंदणी वेळेत पूर्ण करून त्यांना योजनांच्या लाभापासून वंचित राहण्यापासून रोखण्याचे मोठे आव्हान शासनासमोर उभे राहिले आहे.