स्पर्धा परीक्षेच्या उमेदवारांना मोलाचा सल्ला
मुंबई (Officer Tukaram Mundhe) : प्रशासकीय सेवेत अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगून अनेक तरुण वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षांची तयारी करतात. मात्र, या प्रवासात वेळेचे नियोजन आणि पर्यायी करिअरचा विचार करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. ज्येष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांनी स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांना वेळेत ‘प्लॅन बी’ तयार ठेवण्याचा महत्त्वपूर्ण सल्ला दिला आहे.
मुक्त पत्रकार राहुल कुलकर्णी यांनी घेतलेल्या विशेष मुलाखतीत मुंढे (Tukaram Mundhe) यांनी स्पर्धा परीक्षांमधील वाढती स्पर्धा, विद्यार्थ्यांवरील मानसिक ताण आणि प्रशासकीय सेवेतील आवश्यक कौशल्यांवर भाष्य केले. “स्पर्धा परीक्षा हेच आयुष्याचे अंतिम ध्येय असू नये. या परीक्षांच्या तयारीसाठी आयुष्यातील तीन ते चार वर्षे पुरेशी आहेत. त्यानंतरही यश मिळाले नाही, तर पर्यायी मार्गाचा विचार करून आयुष्यात पुढे गेले पाहिजे,” असा सल्ला त्यांनी उमेदवारांना दिला.
प्रशासकीय सेवेसाठी केवळ पाठांतर पुरेसे नाही!
प्रशासकीय सेवेत काम करताना केवळ घोकंपट्टी किंवा पाठांतर उपयोगाचे ठरत नाही. त्यासाठी विषयांचे सखोल आकलन, सूक्ष्म विश्लेषण, निर्णयक्षमता आणि उपलब्ध माहितीचा योग्य अर्थ लावण्याची क्षमता आवश्यक असते, असे मुंढे यांनी स्पष्ट केले. शासनाचे निर्णय प्रभावीपणे अंमलात आणणे, क्लिष्ट विषयांचा गाभा समजून घेणे आणि महत्त्वाच्या पत्रांचा अचूक सारांश तयार करणे, ही प्रशासकीय कामकाजातील महत्त्वाची कौशल्ये आहेत. त्यामुळे उमेदवारांच्या केवळ माहितीच्या आधारे नव्हे, तर त्यांच्या आकलनशक्तीचा आणि विश्लेषणक्षमतेचा कस लावला जाणे आवश्यक आहे.
मुख्य परीक्षा वर्णनात्मक असण्याची गरज
स्पर्धा परीक्षांच्या स्वरूपावर भाष्य करताना मुंढे (Tukaram Mundhe) यांनी मुख्य परीक्षा वर्णनात्मक असण्याचे महत्त्व अधोरेखित केले. प्रशासनात अनेकदा गुंतागुंतीच्या परिस्थितीचे विश्लेषण करून योग्य निर्णय घ्यावा लागतो. त्यामुळे उमेदवारांना विषय समजला आहे की नाही, त्यांचे विचार किती स्पष्ट आहेत आणि ते योग्य पद्धतीने मांडता येतात का, हे तपासणे महत्त्वाचे ठरते. एकूणच, स्पर्धा परीक्षांची तयारी करताना ध्येय निश्चित ठेवण्याबरोबरच वेळेचे योग्य नियोजन, कौशल्यविकास आणि पर्यायी करिअरचा विचार करणे आवश्यक आहे. यश मिळवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करा; मात्र, एका परीक्षेच्या निकालावर संपूर्ण आयुष्य अवलंबून ठेवू नका, हा तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांच्या सल्ल्याचा मुख्य संदेश आहे.