– मशिदीत घुसून मारु, असा मुस्लीमांना दिला होता दम
देशोन्नती वृत्तसंकलन
नागपूर (Devendra Fadnavis) : भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी अहमदनगरमध्ये मुस्लीमांविषयी द्वेषपुर्ण वक्तव्य केल्याने देशभरात प्रचंड खळबळ उडाली आहे. `मशिदीत घुसून मारु’ असा भारतीय मुस्लीम बांधवांना दम दिला होता. उलट राज्यातील पोलिस माझे काही वाकडे करु शकत नाही, अशा अर्विभावात राणे होते. परंतु, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या गृहजिल्ह्यातच त्यांच्यावर गंभीर अशा विविध कलमाखाली गुन्हे दाखल करण्यात आले.
त्यामुळे फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या जिल्ह्यातच गिट्टीखदान पोलिस ठाण्यात आरोपी आ. राणे (Nitesh Rane) यांच्यावर गुन्हे दाखल झाल्याचे बघता ही त्यांच्यासाठी चपराक ठरली आहे. मोहम्मद युनूस मोहम्मद युसूफ पटेल (४७) रा. प्लॉट नं. ५४, उत्कर्ष जी. एन. सोसायटी, पोलिस लाईन टाकळी, अवस्थीनगर, असे फिर्यादीचे नाव आहे. फिर्यादी हे मेहराजुन्न नबी कमीटी, पश्चिम नागपूरचे अध्यक्ष असून सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे.
तर नितेश नारायण राणे (Nitesh Rane) असे आरोपीचे नाव आहे. ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कनकवली विधानसभा मतदार संघाचे भाजप आमदार आहेत. रविवारी त्यांनी रामगिरी महाराज यांच्या समर्थनार्थ शिवाजी चौक, श्रीरामपूर, अहमदनगर येथे आयोजीत भर सभेत त्यांनी आपल्या भाषणात मुस्लीम समाजाला दम दिला. मशिदीत घुसून मुस्लीमांना मारु असे म्हटले होते. हा साधा दम नसून चक्क धमकी होती. आ. राणे यांच्या संविधानविरोधी वर्तन आणि वक्तव्याने देश हादरला. अशा द्वेषपुर्ण वक्तव्याने भारतीय नागरीकांत दरी निर्माण करण्याचा हा प्रयत्न होता. केवळ शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळ्या प्रकरणी महाराष्ट्रातील जनतेचे दुर्लक्ष करण्यासाठी आ. राणे (Nitesh Rane) यांनी केलेला हा केवीलवाना खटाटोप असलयाचे विरोधकांनी म्हटले आहे.
याप्रकरणी आ. राणे (Nitesh Rane) यांच्याविरुद्ध यापूर्वी अहमदनगर व श्रीरामपूरमध्ये पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहे. तर आता नागपूरातही त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे़. या गुन्ह्याची पार्श्वभुमी लक्षात घेता पोलिस आ. राणे यांना अटक करतात की काय, याविषयी पोलिसांच्या भुमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पुढील निवडणुक लढण्यावर प्रतिबंधाची शक्यता
आमदार म्हणून संविधानाची शपथ घेणारे आ. नितेश राणे (Nitesh Rane) या वक्तव्याने चांगलेच अडचणीत आल्याचे म्हटले जात आहे. आ. राणे यांचे हे वक्तव्य संविधानविरोधी असल्यानेच नागपूरातील गिट्टीखदान पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. भविष्यात त्यांची आमदारकी अडचणीत येण्यासह पुढील निवडणूक लढविण्याविषयीही त्यांच्यावर प्रतिबंध लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.