विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व शालेय समस्यांकडे वेधले लक्ष
परभणी (Dharna Andolan) : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताकरीता व शालेय समस्यांसाकडे लक्ष वेधण्यासाठी मराठवाडा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघ संलग्न (Principal Association) परभणी जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ जिल्हा शाखा परभणीच्या वतीने मंगळवार ६ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन (Dharna Andolan) करत लक्ष वेधण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकार्यांमार्फत मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री, शिक्षण आयुक्त शिक्षण संचालक यांना निवेदन सादर केले आहे.
राज्यातील अंशत: अनुदानित, विनाअनुदानित शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना प्रचलित धोरणानुसार अनुदान टप्पा तात्काळ लागू करावा, १ नोव्हेंबर २००५ पुर्वी आणि त्यानंतर अनुदानावर आलेल्या शाळेतील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचार्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, संच मान्यतेचा शासन निर्णय रद्द करून शाळा तिथे (Principal Association) मुख्याध्यापक पद हे धोरण असावे, वर्गाचा दर्जा वाढ निर्णय तात्काळ रद्द करावा, शिक्षक कर्मचारी भरती तात्काळ करावी, कर्मचार्यांसाठी कॅशलेस मेडिकल योजना लागू करावी आदी प्रमुख मागण्या आंदोलनात करण्यात आल्या. प्रशासनाला दिलेल्या निवेदनावर बी.एम. भांगे, डी.एल. उमाटे, गणेश शिंदे, देवानंद अंबुरे, शिवाजी पाचकोर, दिगंबर मोरे, राजकुमार धबडे, रंगनाथ चव्हाण, उपेंद्र दुधगावकर, विष्णू मुंढे, गोिंवद चोरघडे, प्रकाश हरगावकर आदींची नावे आहेत.