भंडारा (Diarrhea infection) : भंडारा तालुक्यातील जवाहरनगर जवळील इंदिरानगर सावरी येथे दुषित पाणी पुरवठ्यामुळे अतिसाराची लागण झाली आहे. दहा रुग्णांना उपचाराकरीता प्राथमिक आरोग्य केंद्र शहापूर येथे आणण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर आठ रुग्णांना भंडार्याला हलविण्यात आले. यामुळे (Diarrhea infection) गावकर्यांत प्रचंड दहशत पसरली आहे.
जवाहरनगर जवळील गट ग्रामपंचायत सावरी येथील इंदिरानगरात दि.१३ सप्टेंबर रोजी सायंकाळी काही लोकांना हगवन, उलटी, पोटात कळ येणे, आवाजात बदल, असे लक्षण जाणवताच गावातील दहा लोकांना जवळील शहापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारार्थ आणण्यात आले. यामध्ये नुपूर सोनू मेश्राम (१३), मयूर अशोक मेश्राम (३०), शकुंतला शिवशंकर बागडे (५०), रायवंता बागडे (६५), पल्लवी सांगोळे (३२), अंजली नितीन गजभिये (२५), प्रदीप मुर्लीधर ढोके (३८), मोहनलाल ब्रिजलाल शाहू (५५), सुंदर मडामे (७४), भोला मडामे (६५), या दहा रुग्णांना शहापूर आयुष्यमान आरोग्य केंद्रात आणण्यात आले.
तेथील वैद्यकीय अधिकारी स्नेहल झोडे यांनी रुग्णांवर उपचार केला. दाखल केलेल्या रुग्णांपैकी प्रदीप ढोके व मोहनलाल शाहू या रुग्णांवर शहापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरु आहे. तर आठ रुग्णांना प्राथमिक उपचारानंतर जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे हलविण्यात आले. दोन रुग्णांचा आवाज गेल्याचे माहिती पुढे येत आहे. या (Diarrhea infection) प्रकरामुळे गावकर्यांत प्रचंड दहशत पसरली आहे. रात्री उशीरापर्यंत आरोग्य विभागाची चमू गावात दाखल झाली नसल्याचे सांगितले जाते.