हिंगोली(Hingoli):- उज्जैनला (Ujjain)जाण्यासाठी पैसे न दिल्याने सख्ख्या भावाची कार जाळून अन्य ठिकाणी दोन मोटार सायकल जाळून ६ लाखाचे नुकसान केल्याने हिंगोली शहर पोलिसात सख्ख्या भावासह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
उज्जैनला जाण्यास पैसे न दिल्याचा मनात राग; दोघांवर गुन्हा दाखल
याबाबत पोलिस सुत्राने दिलेली माहिती अशी की, हिंगोली तालुक्यातील खेड येथील तान्हाजी विजयराव नागरे हे हिंगोलीतील नाईकनगरात वास्तव्यास आहेत. त्यांचा सख्खा भाऊ शिवाजी विजयराव नागरे रा.मंगळवारा हिंगोली याने त्यांना उज्जैन येथे जाण्यासाठी पैसे मागितले असता ते न दिल्याने तुझी गाडी जाळतो अशी धमकी तान्हाजीला दिली. पैसे दिले नसल्याचा राग मनात धरून १२ जुलै रोजी मध्यरात्रीच्या सुमारास नाईकनगर भागात तान्हाजीची चारचाकी ह्युंडाई क्रेटा कार (car)क्रमांक एम.एच.३८-व्ही.९०४५ व साक्षीदाराच्या रामगल्लीतील घरासमोर उभ्या केलेल्या दोन मोटारसायकल जाळून जवळपास ६ लाख रूपयाचे नुकसान(damage) केल्याने हिंगोली शहर पोलिसात तान्हाजी नागरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिवाजी विजयराव नागरे यासह अन्य एका अनोळखी आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला.
या घटनेत तान्हाजी नागरे यांची ह्युंडाई क्रेटा कार क्रमांक एम.एच.३८-व्ही.९०४५ तर रामगल्लीतील सुधाकर बांगर यांची मोटारसायकल क्रमांक एम.एच.३८-ए.८९०८, अजय कान्हेड यांची मोटार सायकल क्रमांक एम.एच.३८-ए.५१४४ ही जाळण्यात आली.विशेष म्हणजे अजय कान्हेड यांची हीच मोटार सायकल ३० मे २०२४ रोजी जाळण्यात (burn) आली होती.