परभणी/ताडकळस(Parbhani):- येथील नवीन पोलिस ठाण्याच्या समोर पूर्णाकडुन जाणाऱ्या रिलायन्सच्या डिझेल टँकरला (Reliance Diesel Tanker) एका गँरेजवर तांत्रिक बिघाडाची दुरुस्ती करीत असताना मंगळवार २१ मे रोजी रात्री ८ ते ९ वाजेच्या दरम्यान अचानक टँकरला आग (Fire) लागली. चालकाने प्रसंगावधान दाखवून तात्काळ आग लागलेल्या टँकरला गावाच्या बाहेर १ किलोमीटर असलेल्या सह्याद्री हाँटेलसमोर पाण्याने आग आटोक्यात आणली.
ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात गर्दी
या बाबत अधिक माहिती अशी की, मुंबई (Mumbai) येथुन पूर्णा रेल्वे स्थानकाकडे ताडकळसहुन शिंगणापूर रोडने अंदाजे २५ हजार लिटर डिझेल घेऊन एम. एच.१२ यु.एम. ०४१५ हे टँकर जात होते. रस्त्याने अचानक तांत्रिक बिघाड (Technical failure) झाल्याने ताडकळस येथील नवीन पोलिस ठाण्याच्या समोर असलेल्या एका गँरेजवर (garage) वेल्डींगचे काम करत होते. अचानक या डिझेल टँकरला आग लागली. पाहता पाहता या आगीचा भडका उडाला. यामुळे ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. मुख्य रस्त्यावर घटना घडल्याने वाहनांच्या रांगा लागल्या.
अग्निशमन पंपाने व पाण्याने आग आटोक्यात
आग मात्र वाढतच जात होती. प्रसंगावधान राखत टँकरचा चालक अशोक मधुकर शिंगोटे रा पिंपळगाव ता. वासी जि. धाराशीव यांनी तात्काळ गावाच्या बाहेर १ किलोमीटर अंतरावर असलेल्या सह्याद्री हॉटेलसमोर गाडी उभी करून या ठिकाणी जवळ असलेल्या अग्निशमन पंपाने व पाण्याने आग आटोक्यात आणली. घटनास्थळी तात्काळ सपोनि कपिल शेळके, पोलिस उपनिरीक्षक गजानन काठेवाडे, भारत तावरे,चाटे, चव्हाण आदी पोलिस कर्मचार्यांनी धाव घेतली. या डिझेल टँकरमध्ये सुमारे २५ हजार लिटर डिझेल होते. सुदैवाने मोठा स्फोट झाला असता तर मोठी जीवित झाली असती. दरम्यान सदरील डिझेल टँकर हे मुंबईहून पूर्णा रेल्वे स्थानकाकडे जात असल्याचे चालकाने सांगितले. परंतु घटना घडली तेंव्हा हा टँकर मुंबईच्या दिशेने जात असल्याचे दिसून आल्याने उपस्थित ग्रामस्थांतून उलट सुलट चर्चेला उधाण आले होते.