मानोरा(Washim):- निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असुन उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरूवात झाली आहे. मात्र राजकीय पक्षांनी अद्यापही आपले उमेदवार जाहीर न केल्यामुळे जनतेला कोणत्या पक्षाकडून कोणता उमेदवार निवडणूकीत उभा राहणार, याबाबतचा प्रश्न पडला आहे. मतदार संघात महाविकास आघाडीची याला तिकीट मिळाली, महायुतीची त्याला तिकीट मिळाली अशी अफवा इच्छूक उमेदवारांचे समर्थक पसरवीत आहेत. ग्रामीण भागातील चावडीवर गप्पा मारणारे नागरीक उमेदवारीवरून घमासान चर्चा रंगवत आहे.
मतदार संघ महायुतीत भाजपला सुटला आहे, तर महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला सुटलेला आहे
कारंजा व मानोरा हे दोन तालुका मिळून एक विधानसभा मतदार संघ (Assembly constituency) आहे. या मतदार संघाची उमेदवारी कोणाला सुटणार याकडे संपुर्ण जिल्हयाचे लक्ष लागलेले आहे. हा मतदार संघ महायुतीत भाजपला सुटला आहे, तर महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला सुटलेला आहे. दोन्ही पक्षाकडे तिकीट मागणाऱ्या उमेदवारांची लाईन लागली आहे. काही उमेदवार मुंबई(Mumbai)येथे उमेदवारीसाठी ठाण मांडून बसले आहेत. तर काही उमेदवार एक पक्षाचा व एक अपक्ष असे दोन उमेदवारी अर्ज घेऊन कार्यकर्त्यांना सोबत घेऊन मतदार संघात मतदार राजाची भेट घेत आहे. महायुती मधील भाजपा कोणत्या उमेदवाराला तिकीट देते, तर महाविकास आघाडीमधील राष्ट्रवादी काँग्रेस तसेच वंचित बहुजन आघाडी कोणत्या उमेदवाराला तिकीट देते या बाबतची रंगतदार चर्चा गाव खेड्यासह शहरात सुरू आहे.