परभणी/गंगाखेड (Nomadic category) : जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या पत्रानुसार गंगाखेड तालुक्यातील भटक्या विमुक्त जातीतील नागरिकांना आज बुधवार रोजी तहसील कार्यालयाच्या सभागृहात आयोजीत विशेष शिबिरात विविध प्रमाण पत्राचे वाटप करण्यात आले.
राज्याचे महसूल मंत्री व भटके, विमुक्त विकास परिषद यांच्या सूचनेनुसार तसेच जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या दि. २७ ऑगस्ट रोजीच्या पत्रानुसार गंगाखेड तालुक्यातील भटक्या विमुक्त जाती प्रवर्गातील (Nomadic category) नागरिकांना शासनाच्या विविध प्रमाणपत्र, राशन कार्ड, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, आयुष्यमान भारत कार्ड आदी बाबत माहिती देऊन त्यांच्याकडून याचे प्रस्ताव घेत आज बुधवार रोजी गंगाखेड तहसील कार्यालयातील सभागृहात उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर, नायब तहसीलदार अशोक केंद्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत विशेष शिबिराचे आयोजन करून राशन कार्ड व अन्य प्रमाण पत्राचे वाटप करण्यात आले. यावेळी पुरवठा निरीक्षक प्रितमकुमार डोडल, महसूल सहायक सिमा घुगे, गणेश सोडगीर, पुरवठा अव्वल कारकून सुमेध वाघमारे आदी उपस्थित होते.