आ. तान्हाजी मुटकुळेंनी सचिवांकडे केली तक्रार
हिंगोली (District Supply Officer) : जिल्हा पुरवठा अधिकारी राजेश पुंजल यांच्या भ्रष्टाचार व वागणुकीबाबत जिल्ह्यातील स्वस्तधान्य दुकानदार संघटनेने आ.तान्हाजी मुटकुळेंकडे केलेल्या तक्रारीची त्यांनी शहानिशा केली असता त्यात सत्यता आढळून आल्याने राजेश पुंजल यांची तात्काळ बदली करून कायमस्वरूपी जिल्हा पुरवठा अधिकारी द्यावा अशी मागणी आ. तान्हाजी मुटकुळे यांनी अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या सचिवांकडे केली आहे.
जिल्हा पुरवठा अधिकारी राजेश पुंजल यांच्या विरोधात जिल्हा रास्तभाव दुकान व किरकोळ केरोसीन विक्रेते संघटनेचे जिल्हाध्यक्ष भिकुलाल बाहेती, जिल्हा सचिव अशोक काळे व उपाध्यक्ष फारूख खान पठाण यांनी आ.तान्हाजी मुटकुळे यांच्याकडे केलेल्या लेखी तक्रारीत नमूद केले की, जिल्हा पुरवठा अधिकारी राजेश पुंजल हे जिल्ह्यातील दुकानदारांना त्रास देऊन पैसे घेत आहेत, ट्रांजक्शन प्रमाणे धान्य मिळते, मागील दोन महिन्यात जितके ट्रांजक्शनने निघालेले धान्य चालू महिन्यात वितरीत होत असते, दुकानदारांना मिळालेले धान्य संपूर्ण वाटप केल्यानंतरही त्यांना शंभर टक्के लाभार्थ्यांना धान्य वाटप का केले नाही म्हणून नोटीस बजावून निलंबित करण्याची कार्यवाही करीत आहेत.
धान्य मिळाले नाही तर दुकानदार धान्य वाटप कुठून करणार, लाभार्थी वंचित राहत असल्याने (District Supply Officer) दुकानदारांवर कार्यवाही करण्याची नोटीस दिली जाते. मे २०२१ मध्ये चलनाचे पैसे भरून मोफत धान्य वाटपाचे आदेश दिले होते. त्याची रक्कम ३३५०००० रूपये मागणी करूनही दुकानदाराला मिळाले नाही. २५ टक्के कमिशन मिळाल्यास मी वाटप करील असे सांगून शासन आदेश असूनही रक्कम दिली नाही. शहरी भागातील दुकानदाराने प्रती महा ५ हजार रूपये व ग्रामीण भागातील दुकानदाराने २ हजार रूपये प्रती महा जमा करून घ्यावे नसता मी दुकाने तपासून निलंबित करेल.
मागील दोन महिन्यात राशन दुकानदारांना दिलेल्या (District Supply Officer) धान्यातून गहू व तांदूळ प्रत्येकी २ क्विंटल कपात करून त्याची परस्पर विल्हेवाट लावली व दुकानदारांना दाब टाकून पोच पावतीवर स्वाक्षर्या घेऊन पुरावा नष्ट केल्याचा आरोप निवेदनात नमूद केला आहे. या गंभीर बाबीचा विचार करता भ्रष्ट अधिकार्याची बदली करावी अशी मागणी जिल्हा रास्त भाव दुकान व किरकोळ केरोसीन विक्रेते संघटनेने आ.तान्हाजी मुटकुळे यांच्याकडे केली असता त्यांनी या तक्रारीची गंभीरतेने दखल घेतली आहे.या केलेल्या आरोपाच्या अनुषंगाने जिल्हा पुरवठा अधिकार्यांना भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते नॉटरिचेबल मिळून आले.
जिल्हा पुरवठा अधिकारी राजेश पुंजल यांच्या विरूद्ध रास्त भाव दुकानदारांनी गंभीर स्वरूपाचे आरोप केल्याने आ. तान्हाजी मुटकुळे यांनी मुख्य सचिवांकडे तक्रार केली असता त्याचा अहवाल तातडीने मागवण्याच्या सूचना दिल्या आहेत.
जिल्हा प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष (District Supply Officer) जिल्हा पुरवठा अधिकारी राजेश पुंजल यांच्या विरूद्ध जिल्हा रास्त भाव दुकान व किरकोळ केरोसीन विक्रेते संघटनेने केलेल्या आरोपानंतर आ. तान्हाजी मुटकुळे यांनी या तक्रारीची गंभीरतेने दखल घेतली. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून यावर कोणती कार्यवाही केली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.