परभणी(Parbhani) :- चिमुकल्यांवरील अत्याचाराची बदलापूर येथील घटना अत्यंत संतापजनक आहे. दिवसेंदिवस राज्यात महिलांवरील अत्याचारांच्या घटनात वाढ होत आहे. महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. मात्र राज्य सरकारला (State Govt) याचे गांभिर्य राहिले नाही. पोलिस बळाचा वापर करुन घटनेचा निषेध करणार्या आंदोलनकर्त्यांचा आवाज दाबला जात आहे. महिला अत्याचाराच्या घटनेचा आणि राज्य सरकारच्या निष्क्रीयतेचा निषेध म्हणून शनिवार २४ ऑगस्ट रोजी परभणी जिल्हा बंदचे आवाहन महाविकास आघाडीने केले आहे. या बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन खा. संजय जाधव यांनी पत्रकार परिषदेत केले.
पत्रकार परिषद महाविकास आघाडीने केले बंदचे आवाहन
खासदार संपर्क कार्यालयात शुक्रवार २३ ऑगस्ट रोजी महाविकास आघाडीच्या वतीने पत्रकार परिषद (Press conference) घेण्यात आली. यावेळी आ.सुरेश वरपूडकर, आ.डॉ. राहूल पाटील, माजी आ. विजयराव गव्हाणे, माजी उप महापौर भगवान वाघमारे, डॉ. विवेक नावंदर, नदीम इनामदार, जाकेर लाला, मनिषाताई केंद्रे, सखुबाई लटपटे आदींची उपस्थिती होती. यावेळी बोलताना खा. जाधव म्हणाले की, राज्यात महिला अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. लाडक्या बहिणीच राज्यात सुरक्षित नाहीत, राज्य सरकार मात्र लाडकी बहिण योजनेचा प्रचार करण्यात व्यस्त आहे. बदलापूर प्रकरणात फिर्याद घ्यायला सुध्दा पोलिस तयार नाहीत. निषेध करणार्या आंदोलकांना गुन्हेगारासाठी वागणूक देऊन ताब्यात घेतले जात आहे.
माणूसकीला काळीमा फसणारी घटना असताना सुध्दा राज्य सरकार कार्यवाही करत नसल्याने कोर्टाने सुध्दा सरकारला फटकारले आहे. मात्र राज्य सरकार अजूनही प्रकरण गांभिर्याने घेत नाही. सत्ताधारी मग्रुर झाले आहेत. भ्रष्टाचारी, गुन्हेगारांना पाठबळ देत आहे. त्यामुळे राज्यात कायद्याचा धाक राहिला नाही. बदलापूर अत्याचार प्रकरणाचा आणि राज्य सरकारच्या नाकर्तेपणाच्या निषेधार्थ शनिवार २४ ऑगस्ट रोजी महाविकास आघाडीतर्फे जिल्हा बंद पुकारला आहे. या बंदमध्ये नागरीकांनी सहभागी होऊन निषेध नोंदवावा, असे आवाहन महाविकास आघाडीच्यावतीने करण्यात आले.