पळसखेड येथील महिलेची तक्रार, दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी!
रिसोड (District Womens Hospital) : जिल्हा स्त्री रुग्णालय, वाशीम येथे वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या (Medical Staff) निष्काळजीपणामुळे प्रसूतीदरम्यान, बाळाचा मृत्यू (Death of Baby) झाल्याचा गंभीर आरोप पळसखेड (ता. रिसोड) येथील लता नामदेव गव्हाणे यांनी केला आहे. त्यांनी दिलेल्या निवेदनात या प्रकरणी संबंधित डॉक्टर, नर्स आणि खाजगी कर्मचाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा (Manslaughter) गुन्हा दाखल करून तातडीने चौकशी सुरू करण्याची मागणी केली आहे.
विनंती करूनही कोणीही रुग्णाची दखल घेतली नाही!
लता गव्हाणे यांच्या म्हणण्यानुसार, त्यांची सून शिवानी वैभव गव्हाणे हिला 2 ऑगस्ट रोजी पहाटे 3 वाजता प्रसूतीसाठी जिल्हा स्त्री रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक तपासण्या करून अहवाल नॉर्मल असल्याचे सांगण्यात आले आणि सकाळी 10 वाजेपर्यंत, प्रसूती (Childbirth) होईल असे सांगण्यात आले. मात्र रात्रीपासून तीव्र प्रसववेदना सुरू असूनही कर्तव्यावर असलेल्या डॉक्टर आणि नर्सेस यांना वारंवार विनंती करूनही कोणीही रुग्णाची दखल घेतली नाही.
प्रसूती करताना रुग्णाच्या गालावर मारणे, अयोग्य पद्धतीने पोटावर दाब देणे, अयोग्य व्यक्तींमार्फत उपचार..
रुग्णालयातील कर्मचाऱ्यांकडे सतत विनंती करूनही सकाळी 3 पासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत कोणीही आले नाही. अखेर सायंकाळी 5 वाजता तपासणी करण्यात आली. तेव्हा रुग्णाची प्रकृती अत्यंत गंभीर झाली होती. त्यानंतर, रुग्णावर अमानुष प्रकारे प्रसूतीसाठी दडपशाही करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. त्यांनी सांगितले की, प्रसूती करताना रुग्णाच्या गालावर मारणे, अयोग्य पद्धतीने पोटावर दाब देणे, अयोग्य व्यक्तींमार्फत उपचार करणे असे प्रकार घडले. त्याचे ठसे रुग्णाच्या शरीरावर आजही स्पष्टपणे दिसत आहेत.
घटनेला रुग्णालय प्रशासनाच्या निष्काळजीपणाला जबाबदार!
सायंकाळी 5.30 वाजता प्रसूती झाली, पण डॉक्टरांनी बाळाच्या हृदयाचे ठोके नसल्याचे सांगून बाळ मृत असल्याचे जाहीर केले. लता गव्हाणे यांनी या संपूर्ण घटनेला रुग्णालय प्रशासनाच्या (Hospital Administration) निष्काळजीपणाला जबाबदार धरले असून, संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर तत्काळ गुन्हा दाखल करावा.
वैद्यकीय पात्रता नसलेल्या व्यक्तींनी तपासणी का केली?
वैद्यकीय पात्रता नसलेल्या व्यक्तींनी तपासणी का केली, याची चौकशी करावी. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी रुग्णालय व्यवस्थापनाने योग्य उपाययोजना कराव्यात. 2 ऑगस्ट रोजी सकाळी 3 पासून सायंकाळी 5 पर्यंत, नातेवाईकांनी विनंती करूनही कोणीच दखल घेतली नाही, याची जबाबदारी निश्चित करावी. ही घटना केवळ एका कुटुंबाला झालेला मानसिक आघात (Mental Trauma) नसून, संपूर्ण आरोग्य व्यवस्थेतील (Health System) ढासळलेल्या जबाबदारीचे लक्षण आहे. जिल्हा प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणी पीडित लता गव्हाणे यांनी केली आहे.
प्रथमदर्शनी दोषी 3 कर्मचाऱ्यांना केले कार्यमुक्त!
या घटने बाबत महिलेची तक्रार प्राप्त झाली असून, प्रथमदर्शनी चौकशी केली असता, यामध्ये 3 कर्मचारी दोषी आढळले असल्यामुळे त्यांना कार्यमुक्त करण्यात आले आहे. पुढील चौकशी सुरू आहे.
डॉ. सचिन साळवे
अधीक्षक जिल्हा महिला रुग्णालय वाशिम