हिंगोली(Hingoli) :- सेवानिवृत्त पोलीस उपायुक्त सुधीर गणपतराव दाभाडे यांची विभागीय पोलीस तक्रार प्राधीकरण मुंबई(Mumbai), ठाणे, नवीमुंबई आणि कोकण विभागाच्या सदस्यपदी नियुक्ती झाली आहे. दाभाडे यांचा शासकीय सेवेतील सर्वाधिक कार्यकाळ हिंगोलीत राहिलेला आहे.
दाभाडे यांचा शासकीय सेवेतील सर्वाधिक कार्यकाळ हिंगोलीत
सेवानिवृत्त पोलीस उपायुक्त सुधीर दाभाडे यांनी पोलीस दलात कर्तव्याप्रती व प्रामाणीकपणे निष्ठा ठेवून सेवा बजावल्याने त्यांना राष्ट्रपती पुरस्काराने दोन वेळेस सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने (Home Department)केंद्र सरकार व सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) मार्गदर्शनाखाली राज्यामध्ये विभागवार पोलीस तक्रार प्राधिकरण निर्माण केले आहेत. या प्राधिकरणाचे अध्यक्ष जिल्हा न्यायाधीश किंवा उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमुर्ती असतात तसेच या प्राधिकरणावर त्या त्या विभागातील कार्यरत उपायुक्त हे पदसिध्द सदस्य व एक अशासकीय सदस्य आणि एक सेवानिवृत्त पोलीस उपायुक्त सदस्य म्हणून नेमल्या जातात. या प्राधीकरणाच्या माध्यमातून जनतेच्या पोलीस अधिकारी व कर्मचार्यांच्या विरोधात असलेल्या तक्रारीची चौकशी करून त्याचे निवारण करणे तसेच कसूूरदार पोलीस अधिकारी, कर्मचार्यांच्या विरोधात शासनाकडे (गृहविभाग) प्रस्ताव पाठविणे यासाठी स्थापन करण्यात आले आहे. विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरणावर सुधीर दाभाडे यांची यापुर्वी ही नियुक्ती केली होती. त्यानंतर आता २० सप्टेंबरला गृह विभागाने काढलेल्या पत्राद्वारे सुधीर गणपतराव दाभाडे यांची सदस्यपदी पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या गृहविभागाने पुढील तीन वर्षाकरीता ही पुर्ननियुक्ती केली आहे. या नियुक्तीबद्दल सुधीर दाभाडे यांचे सर्व स्तरातुन अभिनंदन केले जात आहे.
सुधीर दाभाडेंचा हिंगोली जिल्ह्यात सर्वाधिक कार्यकाळ
सेवानिवृत्त पोलीस उपायुक्त सुधीर दाभाडे यांचा शासकीय सेवेमधील सर्वाधिक कार्यकाळ हिंगोली जिल्ह्यातील आहे. ज्यामध्ये सन १९९३ ते १९९६ या दरम्यान त्यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी तर १ ऑगस्ट २०११ ते ३ ऑगस्ट २०१४ दरम्यान जिल्हा पोलीस अधिक्षक म्हणून काम पाहिले. याच दरम्यान भुषणाची बाब म्हणजे दाभाडे यांना हिंगोलीतच सन १९९४ मध्ये राष्ट्रपती पदक मिळाले. तसेच आयपीएस केडर सुध्दा त्यांना हिंगोलीतच मिळाले आहे. यासोबतच त्यांना पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह आणि सन २००७ मध्ये उल्लेखनिय व अतिउत्कृष्ट कामगिरीमुळे राष्ट्रपती पदक दुसर्यांदा मिळाले. सुधीर दाभाडे यांची सन २०१८ ते २०२१ या दरम्यान विभागीय पोलीस तक्रार प्राधीकरण सदस्यपदी निवड करण्यात आली होती. आता दुसर्यांदा त्यांची फेरनिवड केली असून हा कार्यकाळ पुढील तिन वर्षाकरीता आहे. मुंबई पोलीस आयुक्तालय, ठाणे, नवीमुंबई, वसई-विरार, मिरा-भाईंदर या पोलीस आयुक्तालयासह पालघर, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यातील ठाण्यासह या विभागातील पोलीस विभागाशी संलग्न असलेल्या घटकातील पोलीस अधिकारी, कर्मचार्यांच्या विरोधात असलेल्या तक्रारीची चौकशी करून त्याचे निवारण करणे व कसूरदाराच्या विरोधात कारवाई संदर्भात शासनाकडे प्रस्ताव पाठविणे यासाठी या प्राधिकारणाची स्थापना करण्यात आलेली आहे.