हिंगोली(Hingoli):- सध्या गणेशोत्सव सुरू असून १७ सप्टेंबर पासून श्रीं चे विसर्जन होणार आहे. त्यामुळे मिरवणुकीत (Procession) कोणत्याही सार्वजनिक गणेश मंडळाने डीजे व लेझर लाईट शो चा वापर करू नये असे आवाहन जिल्हा पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी गणेश मंडळाच्या पदाधिकार्यांना घेण्यात आलेल्या बैठकीत बोलताना केले आहे.
जिल्हा पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी सार्वजनिक गणेश मंडळांना बैठकीत दिल्या सूचना
१२ सप्टेंबर रोजी जिल्हा पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या अध्यक्षतेखाली पोलिस अधिक्षक कार्यालयात हिंगोलीतील सार्वजनिक गणेश मंडळ पदाधिकार्यांची बैठक घेण्यात आली. बैठकीत गणेशोत्सव निमित्ताने कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहून हा उत्सव शांततेत साजरा करण्याचे आवाहन पोलिस अधिक्षक कोकाटे यांनी गणेश मंडळांना केले. त्याचप्रमाणे श्री विसर्जन मार्गामध्ये काही अडथळा असल्यास त्याची माहिती गणेश मंडळांनी पोलिस ठाण्यांना द्यावी, कुठेही कायद्याचे उल्लंघन करून ध्वनी प्रदूषण(Noise pollution) करू नये, गणेशोत्सवात जातीय तेढ निर्माण करणारी आक्षेपार्ह गाणे लावू नये तसेच डीजे व लेझर लाईट शो चा वापर करू नये.
स्वत:ची विद्युत व्यवस्था सक्षम ठेवावी
मिरवणुकीत स्वत:ची विद्युत व्यवस्था सक्षम ठेवावी, श्री विसर्जन मिरवणुका काढल्यानंतर कोणत्याही धार्मिक स्थळासमोर मिरवणुकीत गुलालाऐवजी फुलांची उधळण करावी, मिरवणुकीत श्री मुर्तीची उंची कमी असावी, मिरवणुकीत वापरण्यात येणार्या वाहनावर योग्य चालक ठेवावा, स्वत:चे स्वयंसेवक असावेत, पूर्वीप्रमाणे चालत आलेला श्री विसर्जनाचा मार्ग कायम ठेवावा, मिरवणुकीत दोन मंडळात वाजवीपेक्षा अंतर ठेवू नये, तसेच फटाक्यांचा वापर करू नये, विवादीत घोषणा देऊ नये, श्री मुर्ती सांभाळण्यासाठी योग्य व्यक्ती ठेवावी, मद्य प्राशन केलेल्या व्यक्तीना मिरवणुकीत प्रवेश देऊ नये, विसर्जन स्थळापासून लहान मुले, स्त्रीयांना थोड्या अंतरावर ठेवावे तसेच निर्माल्य नदी पात्रात अथवा तलावात न टाकता नगर पालिकेने नियोजित केलेल्या कलक्षात टाकावे, वाहन अचानक बंद पडल्यास ओढण्यासाठी दोर असावा, वाहनाच्या समोर मंडळ, अध्यक्षाचे नाव, मोबाईल नंबर असावा, कुठेही संशयीत वस्तू अथवा संशयीत व्यक्ती निदर्शनास आल्यास पोलिसांना तात्काळ माहिती द्यावी असे आवाहन पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी गणेश मंडळांच्या पदाधिकार्यांना केले.
बैठकीत अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विकास पाटील, जिल्हा विशेष शाखेचे पोलिस निरीक्षक सुधीर वाघ, शहर ठाण्याचे पोलिस निरीक्षक नरेंद्र पाडळकर यांच्यासह नगर पालिकेचे स्वच्छता निरीक्षक बाळू बांगर आणि विविध कार्यालयाचे कर्मचारी, गणेश मंडळाचे अध्यक्ष, पदाधिकारी, प्रतिष्ठीत नागरिकांची उपस्थिती होती.