परभणी (Parbhani):- रात्री दहा ते बारा या वेळेत आपल्या हद्दितील सर्व हॉटेल(hotel), आस्थापना बंद होतील या बाबत पोलीस अंमलदारांनी दक्षता घ्यावी, अशा सूचना नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी १७ ऑगस्ट रोजी सर्व ठाणे अंमलदार यांना दिल्या आहेत.
पोलीस उप महानिरीक्षकांनी दिल्या सूचना; दक्षता घेण्याचे आवाहन
पोलीस ठाणे हद्दितील हॉटेल, आस्थापना वेळेत बंद करण्याबाबत पोलीस उप महानिरीक्षक यांनी परभणी जिल्हा भेटीत सूचना दिल्या होत्या. तसेच या बाबत पत्रव्यवहार करुन कळविण्यात आले होते. मात्र बाजारपेठेतील आस्थापना निर्धारित वेळेनंतरही सुरू राहत असल्याचे दिसत आहे. पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी यांचे याकडे दुर्लक्ष होत आहे. हॉटेल, आस्थापना मध्ये विना परवाना मद्याची साठवण व विक्री तसेच तंबाखुजन्य पदार्थांची (Tobacco products) विक्री होणार नाही या दृष्टीकोनातून त्यांची तपासणी करणे गरजेचे आहे.
ही बाब लक्षात घेता पोलीस ठाण्याचे प्रभारी, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा यांनी रात्री दहा ते बारा या वेळेत आपआपल्या हद्दित फिरुन हॉटेल, आस्थापना विहित वेळेत बंद कराव्यात, वेळेनंतर त्या सुरू राहू नयेत याची दक्षता घ्यावी, अशा सूचना पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी दिल्या आहेत.