मानोरा (Washim) :- शासन वितरण प्रणाली अंतर्गत माहे फेब्रुवारी महिन्यात ई के वायसी करा, अन्यथा शिधापत्रिके मधील लाभार्थी सदस्यांचा धान्याचा लाभ बंद होईल, असे आदेश पुरवठा विभागाकडून (Supply Division) बजावण्यात आले आहे. असे जरी असले तरी वयोवृध्द व ५ वर्षाखालील सदस्य लाभार्थी यांचा अंगठा व्हेरीफाय होत नसल्याने साहेब, आमचा अंगठा लागत नाही, आमचे धान्य बंद होईल का ? असा सवाल वयोवृद्ध लाभार्थी व बालक लाभार्थी सदस्य करीत आहेत.
आमचा अंगठा लागत नाही, आमचे धान्य बंद होईल का ?
आकांक्षित जिल्हयातील मानोरा तालुका हा अती मागास तालुका म्हणून ओळखला जातो. या तालुक्यात लहान, मोठे उद्योग नसल्याने ग्रामीण भागातील वाडी, वस्ती तांड्यातील अनेक कुटुंब घराला कुलुप लावून ऊस तोडणी व पर प्रांतात कामासाठी गेले आहे. शासनाच्या रेशनाचा लाभ घेण्यासाठी अनेक कुटुंबातील एक किँवा दोन व्यक्ती गावात वास्तव्यास आहेत. प्रत्येक माहेवारी हजर असलेल्या कुटुंबातील एक सदस्य रास्त भाव दुकानात उपस्थीती लावुन आपला अंगठा ई-पोस मशिनवर (E-POS machine) देवून धान्याचा लाभ घेत आहेत. तर काही कुटुंबातील लाभार्थी सदस्य आपल्या मोबाईल वरुन ओटीपी करून लाभ घेत आहेत. पुणे , मुंबईसह महानगरात व ऊस तोडणीवर गेलेल्या आणि गावात उपस्थित नसलेल्या शिधा पत्रिकेतील लाभार्थी सदस्यांना ज्या ठिकाणी कामावर आहेत, त्या ठिकाणी E-KYC करण्याचे कळविण्याचे आदेशही संबंधितांनी दिले आहेत.
परंतु ज्या ठिकाणी सुविधा नसेल असे लाभार्थी सदस्यांची केवायसी जर झाली नाही तर त्यांचेही धान्य बंद होणार का? असे अनेक प्रश्न शिधापत्रिका धारकांना पडलेला आहे. शिधापत्रिकेतील लाभार्थी सदस्यांची के – वायसी करण्यासाठी रास्त भाव परवानाधारक शर्थीचे प्रयत्न करून आयसर मशीन व आठ ते दहा वेळा आधार कार्ड नंबर टाकून के वाय सी करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र गावात हजर असलेले वयोवृध्द व लहान बालकांची के – वायसी होत नसल्याने वैतागले आहे.