हिंगोली शहर पोलिसात १८ जणांवर गुन्हा दाखल
हिंगोली (Dr. Babasaheb Ambedkar) : गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी अवमानकारक वक्तव्य केल्याच्या आरोपावरून हिंगोली रिपब्लिकन सेना युवा प्रदेशाध्यक्ष किरण घोंगडे यांच्या नेतृत्वात अमित शहा यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून निषेध नोंदविण्यात आला. सदर प्रकरणात हिंगोली शहर पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला.
देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांचे नाव घेण्याची सध्या फॅशन सुरू आहे, जर आंबेडकर यांचे नाव इतक्या वेळा घेतले त्याऐवजी एखाद्या देवाचे नाव घेतले असते तर स्वर्ग मिळाला असता या वक्तव्याचा हिंगोली निषेध व्यक्त करून अमित शहा यांची प्रतिकात्मक तिरडी यात्रा काढून आंबेडकरी समाजाने रोष व्यक्त केला. यावेळी युवा प्रदेशाध्यक्ष किरण घोंगडे, युवा जिल्हाध्यक्ष विक्की काशिदे, भिमराव इंगोले, प्रा.भिमानंद काळे, लखन सरतापे, राजू सरतापे, सुनील ठोके, गौतम सरतापे, अमोल खंदारे, नरेश रसाळ, भिमराव सपकाळ, पंडित सूर्यतळ, शाहीर प्रकाश दांडेकर, प्रा.बाळासाहेब पाईकराव, प्रफुल पाईकराव, संजय वाकळे, आकाश कांबळे यांच्यासह महिला व पुरूषांची उपस्थिती होती. यावेळी हिंगोली शहर पोलीस ठाण्याच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
केंद्रीयमंत्री अमित शहा यांनी संसदेमध्ये केलेल्या वक्तव्याचा हिंगोलीत १९ डिसेंबरला निषेध नोंदवून अमित शहा यांची प्रतिकात्मक तिरडी यात्रा काढण्यात आली होती.
जमाव बंदीचे उल्लंघन व प्रतिकात्मक प्रेताचे दहन करण्याचा केला प्रयत्न;१८ जणांवर गुन्हा दाखल
हिंगोलीत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) पुतळ्या समोरील रस्त्यावर १९ डिसेंबरला दुपारी २ च्या सुमारास आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकार्यांच्या सीआरपीसी कलम ३७ (१) (३) जमावबंदीचे आदेश लागू असताना देखील त्यांच्या आदेशाची अवहेलना करून एकत्र जमून केंद्रीय मंत्री अमित शहा (भारत सरकार) यांची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढून त्याचे दहन करण्याचा प्रयत्न केला.
तसेच विरोधात घोषणाबाजी व निषेध आंदोलन केले. पोलिसांनी दिलेल्या लेखी बी.एन.एस.कलम १६८ च्या नोटिसीचे उल्लंघन केल्याने हिंगोली शहर पोलिसात संजय तोडेवाले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रिपब्लिकन युवासेना प्रदेशाध्यक्ष किरण घोंगडे रा.औंढा ना., रिपब्लिकन युवा सेना जिल्हाध्यक्ष विक्की काशिदे, लक्ष्मण सरतापे रा.हिंगोली, सुनील राघोजी ठोके, नरेश रसाळ, सुनील इंगोले, भिमराव सपकाळे, प्रफुल पाईकराव सर्व रा.हिंगोली यासह इतर आठ ते दहा जणांवर कलम १३५ मपोका यासह इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास भगत करीत आहेत.