हिंगोली (Tractor accident) : तालुक्यातील नर्सी नामदेव येथील ट्रॅक्टर चालकाचा माळसेलू शिवारात अपघातामध्ये मंगळवारी पहाटेच्या सुमारास मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याबाबत पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, हिंगोली तालुक्यातील नर्सी नामदेव येथील दिपक गजानन मोरे (२०) हा युवक घोटादेवी येथील एका ट्रॅक्टरवर चालक म्हणून काम करीत होता. ९ डिसेंबर सोमवार रोजी मध्यरात्रीच्या सुमारास गोरेगाव मार्गे माळसेलू येथे ट्रॅक्टर घेऊन गेला होता. पहाटेच्या सुमारास तो परत येत असताना माळसेलू शिवारात (Tractor accident) ट्रॅक्टर उलटल्याने तो गंभीररित्या जखमी झाला होता.
अपघाताची माहिती हिंगोली ग्रामीण पोलिसांना मिळाल्या नंतर त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन जखमी दिपकला उपचारासाठी हिंगोली जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल केले होते. डॉक्टरांनी त्याची तपासणी केल्यावर मृत घोषित केले. मंगळवारी त्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. दिपक मोरे याच्यावर नर्सी नामदेव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई, वडील, बहीण असा परीवार आहे.