लातूर (Latur):- गुटखा, सुगंधित तंबाखू व पानमसाला विक्रेते, साठेबाज यांच्यावर धाडी टाकूनही लातूरमध्ये गुटखा, सुगंधित तंबाखू (Aromatic tobacco) व पानमसाला यांची विक्री होतेच कशी? असा प्रश्न पडलेल्या पोलीस वाल्यांनी आता गुटख्याचे टेम्पो सोडून टपरी चालकांवर मोर्चा वळविला आहे. त्यामुळे गेल्या दोन तीन दिवसांपासून जिल्हाभर पानटपऱ्या बंद ठेवण्यात आल्या आहेत. करोडोंची उलाढाल करणारे सोडून रोजचं पोट भागविणारे रडारवर घेतल्याने गोरगरीब पानटपरीचालकांची उपासमार सुरू झाली आहे.
करोडोंची उलाढाल करणारे सोडून रोजचं पोट भागविणारे रडारवर!
लातूर शहरासह जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पानटपऱ्यांचा व्यवसाय चालतो. यातून अनेकांचे संसार उभे आहेत. तसे जिल्ह्यात पान टपऱ्या आणि सुपारी खाणाऱ्यांची संख्याही जास्तच आहे. मात्र, मागील दोन अडीच महिन्यांपूर्वी नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक म्हणून शहाजी उमाप यांनी पदभार घेताच प्रत्येक जिल्ह्यात जाऊन गुटखा, मटका, अवैध व्यवसाय बंद करण्यासाठी कठोर पावले उचलण्याच्या सूचना पोलीस प्रशासनाला केल्या होत्या. तेव्हापासून जिल्ह्यातील सर्वच अवैध धंद्यांवर पोलिसांच्यावतीने थेट कारवाई करण्यात येत आहे. जिल्ह्याच्या विविध भागातील गुटखा, सुगंधित तंबाखू, पानमसाला विक्रेते व साठेबाजांवर थेट कारवाई करण्यात आली. करोडो रुपयांचा मुद्देमाल जप्त करून गुन्हे दाखल करण्यात आले. लातूर जिल्ह्यात सीमावर्ती भागातून येणारा गुटखा, सुगंधित तंबाखू व पानमसाला अडविण्यात आला.
जिल्ह्यात सीमावर्ती भागातून येणारा गुटखा, सुगंधित तंबाखू व पानमसाला अडविण्यात आला
परंतु, लातूर शहरासह जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर प्रत्येक पानटपरीवर गुटखा व पानमसाला, सुगंधित तंबाखू सप्लाय होत होता. हा येतोच कुठून का कुंपणच शेत खात होते! हा शोध लावण्यासाठी चक्क पोलिसांनी छोट्या छोट्या खेडोपाडी असणाऱ्या पानटपरीवर आपला मोर्चा वळविला असून कारवाईच्या भितीने ग्रामीण भागासह लातूर शहरातील पान टपऱ्या बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे टपरी चालकांसमोर रोजी रोटीचा प्रश्न निर्माण झाला असून कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा भागवायचा हा मोठा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे. गेल्या दोन तीन दिवसांपासून पानाला चुनाही न लावता पोलीसांच्या धास्तीने पान टपरी लॉकडाऊन करुन फिरत आहेत.