परभणी (Parbhani):- तालुक्यातील पिंगळी येथील रेल्वे गेटवर उड्डाणपूल नसल्याने दररोज येथील रेल्वेगेट २५ ते ३० वेळा बंद होत असल्याने अनेकवेळा या रस्त्यारून परभणी व नांदेड येथील दवाखान्यात उपचारासाठी घेऊन जात असलेल्या रुग्णांचा (patients) जीव धोक्यात येत असल्याच्या घटना घडत आहेत. यामुळे परभणी – पिंगळी रोडवरील रेल्वेगेटवर उड्डाणपूल करण्याची मागणी प्रवाशांसह वाहनचालकांतून करण्यात येत आहे.
परभणी – पिंगळी रोडवर रेल्वे उड्डाणपूल करणे गरजेचे
परभणी शहरापासून जवळच असलेल्या पिंगळी येथे परभणी रोडवर रेल्वेगेट आहे. या रेल्वे (Railway)पटरीवरून दररोज दिवसभरात २५ ते ३० रेल्वेगाड्या नांदेड, पूर्णा, हैद्राबाद, अकोला, हिंगोली, परळी, औरंगाबाद, पुणे, मुंबई आदी ठिकाणी जातात. तसेच चंद्रपूर व अकोला येथून परळी व औरंगाबादकडे मालगाड्यादेखील जात असतात. या रेल्वे गाड्या जात असताना पिंगळी जवळील रेल्वेगेट बंद करण्यात येतो. यामुळे किमान १० ते १५ मिनीट वाहने बंद असतात. या रस्त्यावरून परभणी, पिंगळी, ताडकळस, पालम, लिमला, देऊळगाव दुधाटे, वझूर, ताडलिमला या ठिकाणी शेकडो वाहने ये – जा करतात. तसेच महाराष्ट्र शासनाची एसटी महामंडळ देखील ये – जा करते.
अकोला येथून परळी व औरंगाबादकडे मालगाड्यादेखील जात असतात
सध्या परभणी येथून नांदेडला जाण्यासाठी पिंगळी – ताडकळस – पूर्णा मार्गे मोठ्या प्रमाणात वाहने जात आहेत. तसेच पालम, ताडकळस, पिंगळी, देऊळगाव दुधाटे, वझूर या परिसरातील रुग्ण परभणी येथे उपचारासाठी येतात. तसेच परभणी येथून नांदेड येथे देखील पुढील उपचारासाठी मोठ्या प्रमाणात रुग्णांची संख्या आहे. परंतु नेहमीच पिंगळी जवळील रेल्वेगेट बंद होत असल्याने अनेकवेळा रुग्णांचा जीव धोक्यात जात आहे. यामुळे शासनाने या प्रकाराची दखल घेऊन तात्काळ पिंगळी जवळील रेल्वेगेटवर उड्डाणपूल करावा अशी मागणी प्रवाशांसह वाहनचालकांतून करण्यात येत आहे.