हिंगोली/कनेरगाव नाका (Lightning Death) : हिंगोली तालुक्यातील दुर्गधामणी शिवारात शेतात झाडाखाली थांबलेल्या तरुण शेतकर्याचा विज पडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी १२ सायंकाळीच्या सुमारास घडली आहे. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे.
हिंगोली तालुक्यातील दुर्गधामणी येथील बिस्मील्लाखाँ गुलाम महम्मद खान (३०) यांचे दुर्गधामणी शिवारात शेत आहे. या शेतात पेरणीपूर्व मशागतीची कामे सुरु आहेत. त्यानुसा बिस्मील्लाखाँ हे त्यांच्या आई, वडिलांसह गुरुवारी १२ जूनला शेतात कामासाठी गेले होते. (Lightning Death) सायंकाळीच्या सुमारास वादळी वार्यासह पाऊस सुरु झाला. त्यामुळे त्यांचे आई, वडिल झोपडीत गेले तर बिस्मील्लाखाँ हे एका झाडाखाली आश्रयाला थांबले होते. काही वेळातच विजेचा कडकडाट होऊन विज झाडावर पडली. त्यामुळे बिस्मील्लाखाँ जागीच कोसळले.
दरम्यान, काही वेळानंतर त्यांच्या कुटुंबियांना या प्रकाराची माहिती मिळताच त्यांनी बिस्मील्लाखाँ यांना उपचारसाठी (Lightning Death) हिंगोली येथे खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणी करून त्यांचा मृत्यू झाल्याचे जाहिर केले. मयत बिस्मील्लाखाँ यांच्या पश्चात आई, वडिल, दोन भाऊ, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. त्यांचे दोन्ही भाऊ सैन्यदलात देशसेवा करतात तर ते शेती करत होते. या घटनेमुळे त्यांच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.दरम्यान, मयत बिस्मील्लाखाँ यांच्यावर शुक्रवारी १३जूनला सकाळी दुर्गधामणी येथे दफनविधी करण्यात आला.
कनेरगाव नाका येथून जवळच असलेल्या कानडखेडा खुर्द येथील महिला सौ बेबी राजू सावके ( ४५) वर्ष ही आपल्या घरच्या शेतात गट नं ७२ मध्ये काडीकचरा वेचण्यासाठी आपल्या जाऊबाई सोबत गेली असता अचानक १३ जून रोजी दुपारी एकच्या दरम्यान जोरदार पाऊस व वीजां चा कडकडाट चालू असताना सदरील महिला आपल्या शेतातील एका पळसाच्या झाडाजवळ उभी राहिले असतात त्या ठिकाणी अचानक वीज पडल्याने महिला जागेवरच दगावली.
या महिलेसोबत असलेल्या तिच्या जाऊबाई ने शेताच्या आजूबाजूला असलेल्या शेतकर्यांना त्या ठिकाणी बोलावले त्यानंतर महिले ला उचलून रस्त्यावर आणले व त्यानंतर त्या ठिकाणाहून वाशिम येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले व त्यानंतर शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या स्वाधीन केले. बेबीबाई राजु सावके यांना दोन मुले व दोन मुली पती व सासु असा परिवार आहे. बेबीबाई च्या मृत्यूने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.




