आमगाव (Eid e Miladunnabi) : शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही ईद ए मिलादुन्नबीचा उत्सव मोठ्या उत्साहात व श्रद्धेने साजरा करण्यात आला. इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मदिनानिमित्त साजरा होणारा हा दिवस केवळ धार्मिक पर्व नसून, मानवता, शांतता, सहिष्णुता व बंधुतेचा संदेश देणारा आहे.
नागपूर येथून आलेले मोलाना जामी हसन यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की, “हजरत मोहम्मद पैगंबरांनी सत्य, शांती, करुणा, समानता आणि बंधुतेचे जिवंत दर्शन घडवून मानवजातीस दिशा दिली. एकमेकांचा सन्मान व समाजातील सर्व घटकांमध्ये सहिष्णुतेची भावना जागवणे हेच (Eid e Miladunnabi) मिलादुन्नबीचे खरे सार आहे.” या निमित्ताने जामा मशिदीत परचमकुशाईनंतर शहरातील प्रमुख मार्गाने भव्य मिरवणूक काढण्यात आली व त्याचा समारोप ईदगाह येथे आयोजित सभेत झाला.
कार्यक्रमात समाज व शासकीय सेवेत विशेष योगदान देणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये जिल्हा प्रमुख ज. शिवसेना सुरेंद्र नायडू यांच्या अध्यक्षतेखाली तहसीलदार सौ. मोनिका कांबळे, पोलीस निरीक्षक तिरुपती राणे, अनिल जोशी, ज्येष्ठ समाजसेवक यशवंत मानकर, ज्येष्ठ पत्रकार भोला गुप्ता, समाजसेवक अतुल चौहान आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
विशेष म्हणजे कार्यक्रमाध्यक्ष सुरेंद्र नायडू यांनी ईदगाह शेडसाठी शासकीय योजनेतून दहा लाख रुपये मंजूर करून त्याचा भूमिपूजन सोहळा मुख्य पाहुण्यांसह पार पाडला.यंदाच्या ईद पर्वाची एक अनोखी वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे विविध अनावश्यक खर्च (जसे डीजे साउंड सिस्टम) टाळून त्याऐवजी गरजू कुटुंबांना राशन, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व काही मुलांची शालेय फी भरून देण्याचा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाचे समाजात सर्वत्र कौतुक होत आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन (Eid e Miladunnabi) ईद मिलादुन्नबी कमिटीचे अध्यक्ष ज. मो. रिजवान भुरा यांनी केले होते. तसेच नागपूरहून सैय्यद जावेद हसन, अली हसन, ज. साजिद रजा, ज. कलाम बरकाती, जनाब नासीर शेख, ज. मो. मुश्ताक शेख, डॉ. साजिद खान, शाहिद खान, ज. हनीफ धांची यांच्यासह शहरातील मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. साजिद खान यांनी केले तर आभार प्रदर्शन मो. रिजवान भुरा यांनी केले.




