साकोली(Bhandara):- नागझिरा वनक्षेत्रांतर्गत साकोली तालुक्यातील तुडमापूर येथे दि.३० जुलै २०२४ रोजी सकाळी धक्कादायक घटना उघडकीस आली. आई-वडीलांसोबत सकाळी फिरण्यास गेलेल्या आठ वर्षीय बालिकेवर दबा धरुन असलेल्या बिबट्याने(Leopard) हल्ला चढविला.
वनअधिकार्यांनी रुग्णालयात जाऊन केली जखमीची विचारपूस
सोबत असलेल्या आई-वडीलांनी आरडाओरड करुन बिबट्याला पळवून लावले. बिबट्याच्या हल्ल्यात धनश्री टेकराम घोरमारे (८) ही चिमुकली थोडक्यात बचावली असली तरी यात ती जखमी झाली. जखमीवर साकोली उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असून प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगितले जात आहे. वरिष्ठ वनअधिकार्यांनी उपजिल्हा रुग्णालयात जाऊन जखमी बालिकेची आस्थेने विचारपूस केली. या घटनेमुळे तुडमापुरी परिसरात बिबट्याची दहशत कायम असल्याने नागरिकांत धडकी भरली आहे. साकोली येथील नवजीवन विद्यालयात तिसर्यावर्गात शिकणारी धनश्री ही दि.३० जुलै रोजी सकाळी आपल्या आई-वडीलांसोबत गावालगतच्या जंगल (forest) परिसरात फिरण्यास गेली होती. आई-वडीलांसोबत धनश्री मागे-मागे जात असतांना अचानक झुडपात दबा धरुन असलेल्या बिबट्याने एकाएकी धनश्रीवर हल्ला चढविला. अचानक घडलेल्या बिबट्याच्या हल्ल्याने धनश्री घाबरली. तिने आरडाओरड करताच पुढे असलेले आई-वडीलांनी मागे वळून पाहिले असता प्रकार लक्षात आला. आई-वडीलांनी आरडाओरड करुन बिबट्याला हुसकावून लावले.
जखमी बालिकेची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगितले
बिबट घटनास्थळावरुन पसार झाला. सुदैवाने आठ वर्षीय धनश्री थोडक्यात बचावल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र तिच्या शरीरावर ओरबडल्याने जखमी झाली. जखमीला तत्काळ उपजिल्हा रुग्णालय (Upazila Hospital) साकोली येथे दाखल करण्यात आले. जखमी बालिकेची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगितले जाते. बिबट्याच्या हल्ल्याची माहिती वनविभागाला (Forest Department) देण्यात आली. वनविभागाचे उपवनसंरक्षक राहुल गवई, नागझिरा वन्यजीव विभागाचे उपसंचालक पवन जेफ, मानद वन्यजीव संरक्षक शाहीद खान, सहाय्यक वनसंरक्षक (Conservator of Forests) साकोली संजय मेंढे, वनपरिक्षेत्र अधिकारी साकोली मनिषा चव्हाण व वनक्षेत्रअधिकारी साकोली सुनील खांडेकर यांनी उपजिल्हा रुग्णालयात जाऊन जखमींची आस्थेने विचारपूस केली. घटनास्थळी जाऊन घटनेचा पंचनामा केला. जखमी बालिकेच्या परिवाराला वनविभागाने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी वरिष्ठ वनअधिकार्यांनी आर्थिक मदत देण्याचे आश्वासन दिले.