परभणी/गंगाखेड(Parbhani):- परळी रस्त्यावरील वैतागवाडी शिवारातील शेत आखाड्यावर सोमवार २० जानेवारी रोजीच्या पहाटे १ वाजेच्या सुमारास तीन अज्ञात चोरट्यांनी दरोडा टाकत वृद्ध शेतकऱ्यास मारहाण करून त्याच्या पत्नीच्या अंगावरील सोन्या, चांदीचे दागिणे जबरदस्तीने पळविल्याची घटना घडली. या घटनेत वृद्ध शेतकरी (Farmer)गंभीर जखमी झाला असुन परिसरातील शेत आखाड्यावर मात्र भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
वरिष्ठपोलिसांनी ग्रामीण भागात गस्त वाढवावी
गंगाखेड परळी रस्त्यावरील वैतागवाडी शिवारातील शेत आखाड्यावर बाबुराव शाहूराव वैतागे वय ६५ वर्ष, त्यांची पत्नी दैवशाला बाबुराव वैतागे वय ६० वर्ष, मुलगा प्रकाश वैतागे हे रविवार १९ जानेवारी रोजी रात्री झोपी गेले असता मध्यरात्री १२:३० ते १ वाजेच्या सुमारास शेत आखाड्यावर तीन अनोळखी इसम येऊन उभा राहिले तेंव्हा बाबुराव वैतागे यांनी “कोण आहे रे असा आवाज दिल्याने त्या तिघांपैकी एकाने गप्प बस जास्त ओरडू नकोस” असे म्हणून बाबुराव वैतागे यांच्या डोक्यात लाकडी काठीने मारून जखमी केले. त्यानंतर दोघांनी फिर्यादी दैवशाला बाबुराव वैतागे यांच्या गळ्यातील सोन्याची पोत, कानातील सोन्याच्या काड्या, हातातील चांदीच्या पाटल्या, पायातील चांदीचे जोडवे असे अंदाजे २७५०० रुपये किंमतीचे सोन्या, चांदीचे दागिणे जबरदस्तीने काढून घेत प्रकाश वैतागे याच्याकडे पैसे, मोबाईल आहे का असे विचारून आखाड्याच्या पाठीमागे पळून गेले.
शेत आखाड्यावर दरोडा टाकून चोरट्यांनी वृद्ध शेतकऱ्यास मारहाण
चोरट्याच्या मारहाणीत गंभीर जखमी गंभीर जखमी झालेल्या बाबुराव वैतागे यांना विठ्ठल दामोदर वैतागे यांच्या मदतीने प्रथम गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात दाखल करून येथे प्रथमोपचार करून परभणी येथील रुग्णालयात हलविण्यात आले. याप्रकरणी दैवशाला बाबुराव वैतागे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याचा पुढील तपास पो उप नि रामधन डोईफोडे हे करीत आहेत. शेत आखाड्यावर दरोडा टाकून चोरट्यांनी वृद्ध शेतकऱ्यास मारहाण करून गंभीर जखमी करत सोन्या चांदीचे दागिणे पळविल्याची घटना घडल्याने परिसरातील शेत आखाड्यावर भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.