खुनाचे कारण अद्यापही स्पष्ट होईना
कळमनुरी पोलिसात गुन्हा दाखल
कळमनुरी/वारंगा मसाई (Murder Case) : कळमनुरी तालुक्यातील वारंगा मसाई येथील येथील शेतकरी साहेबराव नागोजी गिराम वय ६५ वर्षे हे नेहमीप्रमाणे ११ नोव्हेंबर शेतातील आखाड्यावर झोपण्यासाठी गेले होते. मात्र रात्री अज्ञात व्यक्तीकडून साहेबराव गिराम यांचा खून (Murder Case) झाल्याची घटना १२ नोव्हेंबर रोजी सकाळी वार्यासारखी गावात पसरली. याप्रकरणी कळमनुरी पोलिसात अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कळमनुरी तालुक्यातील वारंगा मसाई येथील शेतकरी साहेबराव गिराम यांची शेती वारंगा मसाई जांभरुण च्या शिवेलगत आहे. नेहमीप्रमाणे गिराम हे ११ नोव्हेंबर रोजी रात्री च्या सुमारास त्यांच्या शेतात आखाड्यावर झोपण्यासाठी गेले होते. परंतु ते १२ नोव्हेंबर रोजी सकाळी घराकडे परत न आल्याने त्यांचा मुलगा शेतात गेला असता बाजेवर रक्ताच्या थारोळ्यात साहेबरावचा मृतदेह दिसून आला. त्यांनी घरातील व्यक्तीला इतरांना या घटनेची माहिती दिली. तसेच कळमनुरी पोलिसांना माहिती दिल्यानंतर जिल्हा पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विकास पाटील यांनी लगेच घटनास्थळी जाऊन भेट दिली.
यावेळी श्वान पथकाला सुद्धा पाचारण करण्यात आले होते. श्वान हा मयत साहेबराव यांच्या घरापर्यंत गेला होता. हा खून कोणत्या कारणावरून झाला याचा मागोवा पोलिसांना लागला नाही. त्यामुळे कळमनुरी पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मोहन भोसले, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक शिवसांब घेवारे, पाटील,राजू ठाकूर, नांदापूर बीट जमादार पोले, अंबादास भुसारे यांच्यासह कर्मचार्यांच्या उपस्थितीमध्ये मयत साहेबराव नागोजी गिराम यांच्या शेतात पंचनामा करण्यात आला.
सदरील मृतदेह कळमनुरी ग्रामीण रुग्णालयात मृतदेह (Murder Case) नेण्यात आला.शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधिन करण्यात आला. या प्रकरणी विष्णू गिराम यांनी कळमनुरी पोलिस ठाण्यात रितसर तक्रार दिली.ज्यामध्ये साहेबराव गिराम यांचा कोणत्यातरी अज्ञात कारणासाठी त्यांच्या डोक्यावर धारधार शस्त्राने वार करून खुन केल्या प्रकरणी अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक शेवाळे हे करीत आहेत. पोलिसांनी आरोपी शोधासाठी तपासचक्र फिरविले असुन काही महत्वाचे धागेदोरे हाती लागले आहेत.