जळगाव (Jalgaon):- जिल्ह्यातील जळगाव व रावेर या दोन्ही लोकसभा (Lok Sabha) क्षेत्रातील मतदान केंद्रावर सकाळपासून संथ गतीने मतदानाला (Vote) सुरुवात झाली आहे. सुरुवातीला मतदान केंद्रांवर रांगा दिसत असल्या तरी टक्केवारी मात्र फारशी उत्साहवर्धक नसल्याचे चित्र आहे. दुसऱ्या टप्प्यात म्हणजे नऊ ते बारा वाजेच्या दरम्यान मतदान मोठ्या संख्येने होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
जळगाव लोकसभा – 6.14 %
रावेर लोकसभा – 7.14 %
जळगाव जिल्ह्यातील 1845 केंद्रावरून वेबकास्टिंग सुरु…
जिल्ह्यातील रावेर आणि जळगाव लोकसभा मतदार संघात एकूण 3886 मतदान केंद्र आहेत. त्यातील 1845 मतदान केंद्रावर वेबकास्टिंग सुरु असून जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील अल्प बचतभवन सभागृहात मोठमोठ्या सहा स्क्रीनवर हे लाईव्ह सुरु आहे. मतदान केंद्रावरील मतदानाची गुप्तता सोडून. मतदान केंद्रावर काय सुरु आहे ? हे अल्पबचतभवन मध्ये बसून टिपले जात आहे. तिथे अधिकारी आणि कर्मचारी त्याची पाहणी करत आहेत.
अल्पबचतभवनचे चित्र पालटले
अल्पबचत भवन मधले सगळे फर्निचर काढून त्या मोठ्या हॉल मध्ये एका बाजूला तीन आणि दुसऱ्या बाजूला तीन असे भव्य स्क्रीन उभे केले आहेत. त्याच्यावर रावेर लोकसभा आणि जळगाव लोकसभा क्षेत्रातील जवळपास 50 टक्के मतदान केंद्रावरून वेब कॅमेऱ्याच्या (Web camera) माध्यमातून नजर ठेवली जात आहे. मतदान केंद्रावर काहीही झाले तर तात्काळ मदत पोहचवता यावी, कायदा, सुव्यवस्था राखली जावी, मतदारांना भयमुक्त वातावरणात मतदान करता यावे म्हणूनही ही सुविधा उपयोगी पडत आहे.