मुंबई: विधान परिषदेच्या 4 जागांसाठीच्या निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. या चार जागांमध्ये दोन शिक्षक तर दोन पदवीधर मतदार संघाचा समावेश आहे. मुंबई आणि कोकण पदवीधर मतदार संघ, तर नाशिक आणि मुंबई शिक्षक मतदार संघात ही निवडणूक होणार आहे. या चारही जागांची मुदत 7 जुलै 2024 ला संपत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 22 मे आहे तर, मतदानाची तारीख 10 जून आहे. 13 जूनला मतमोजणी होईल.
मुंबई पदवीधर मतदार संघातून संजय पोतनीस तर कोकण पदवीधर मतदार संघातून निरंजन डावखरे यांची मुदत 7 जुलैला संपत आहे. तर मुंबई शिक्षक मतदार संघातून कपिल पाटील आणि नाशिक शिक्षक मतदार संघातून किशोर दराडे यांचीही मुदत संपत आहे. त्यामुळे या निवडणुकीची घोषणा झाली आहे. लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी संपल्यानंतर लगेचच या चार विधान परिषदेच्या जागांसाठी मतदान होणार आहे.
15 मे ला निवडणुकीचे नोटीफीकेशन निघेल. त्यानंतर 22 मे पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करावे लागणार आहेत. 27 मे पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. तर 10 जूनला सकाळी 8 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे. 13 जूनला मतमोजणी केली जाईल. 18 जूनला निवडणूक प्रक्रीया पुर्ण केली जाईल.