महाविकास आघाडीच्या एकजुटीने घडविला इतिहास, जिल्ह्यात अभूतपूर्व जल्लोष
- अमरावती विधानसभा ठरली गेम चेंजर
बडनेरा – मेळघाट नवनीत राणांच्या पाठिशी
आ. बच्चू कडूंची स्वप्नपूर्ती - हा विजय जनशक्तीचा !
अमरावती (Amravati ) : निवडणुकीत जनशक्तीला अपार महत्त्व आहे. काही मंडळी धनशक्तीच्या जोरावर राजकारण करू पाहतात, विविध शासकीय यंत्रणांचा गैरवापर करतात; मात्र त्यातून मिळणारा आनंद हा अल्पकाळाचा असतो. अमरावती लोकसभा मतदारसंघातही धनशक्तीचा वापर बड्या उमेदवारांकडून करण्यात आला; मात्र सर्वसामान्य जनतेने या उमेदवाराला नाकारून जनशक्तीला विजयी केले. माझा विजय हा सर्वसामान्य मतदार, काँग्रेस कार्यकर्ते (Congress ) व महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) प्रत्येक घटकाचा आहे, अशी प्रतिक्रिया नवनिर्वाचित खासदार बळवंत वानखडे (MP Balwant Wankhade) यांनी दिली.अमरावती लोकसभा मतदारसंघात भाजपाच्या उमेदवार नवनीत राणा यांचा दणदणीत पराभव केल्यानंतर बळवंत वानखडे यांनी सर्वसामान्य जनतेला हा विजय समर्पित केला. दर्यापूर तालुक्यातील लेहगाव या छोट्याशा गावातून ग्रा. पं. सदस्यापासून राजकीय वाटचाल करणारे बळवंत वानखडे आता अमरावतीचे खासदार म्हणून निवडून आले आहेत. दर्यापूरचे आमदार म्हणूनही त्यांनी उत्तम काम केल्याने लोकसभा मतदारसंघातील नागरिकांनी वानखडेंना थेट संसदेत पाठविले. नवनीत राणा(Navneet Rana) यांच्या भोवती असलेले ग्लॅमर, युवा स्वाभिमान व भाजपाचे पाठबळ यावर मात करीत वानखडे यांनी शर्थीचे प्रयत्न करीत विजय खेचून आणला. विविध एक्झीट पोलमध्ये त्यांचा पराभव होणार, अशा वल्गना करण्यात आल्या होत्या; मात्र शांत व संयमी स्वभावाच्या वानखडे यांनी कोणतीही तिखट प्रतिक्रिया न देता मतमोजणीची वाट पाहिली. मतपेटीतून आपल्यावर जनतेने विश्वास व्यक्त केला आहे. या विश्वासाला कदापी तडा जाऊ देणार नाही, विकासाच्या प्रक्रियेत सर्वांना सामावून घेण्यात येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
– विजयाची कारणे
> काँग्रेस पदाधिकाऱ्यांसह महाविकास आघाडीची अभूतपूर्व ऐकी
> आ. यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वात काँग्रेस जिल्हाध्यक्ष बबलू देशमुखांच्या टीमने सांभाळलेली धुरा
> युवा स्वाभिमान, भाजपामध्ये नसलेला सुसंवाद, एकमेकांवरील अविश्वास त्यामुळे प्रचारात आलेला ढिसाळपणा
- पक्षासाठी अहोरात्र कार्य करणार
भारतीय जनता पक्षाने (Bharatiya Janata Party) माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्तीला देशपातळीवर ओळख निर्माण करून दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश चौफेर प्रगती करीत आहेत. या यज्ञकुंडात संपूर्ण देशवासी सहभागी आहेत. मीसुध्दा पक्षाची कार्यकर्ती म्हणून समर्पित भावनेने कार्य करणार आहे. निवडणुकीतील पराभव मला विचलित करू शकत नाही. पराभवाची कारणमीमांसा करून पक्षासाठी यापुढे अहोरात्र कार्य करीत राहणार
– नवनीत राणा, भाजपा
- जनसेवेत खंड पडणार नाही
आमच्यासारख्या शिवसैनिकांना निवडणुका नवीन नाही. जय-पराजय सुरूच असतात त्यामुळे खचून जाण्याचे काहीही कारण नाही. झालेला पराभव आमच्या जनसेवेत खंड पाडू शकणार नाही. जनशक्ती विरुध्द धनशक्ती अशी ही निवडणूक होती. बळवंत वानखडे सारख्या समर्पित कार्यकर्त्याचा विजय झाला, याचा एक कार्यकर्ता म्हणून आनंदच आहे. यापुढेही अन्यायाविरुध्द लढत राहणार
– दिनेश बूब, प्रहार