निलंगा तालुक्यातील हंचनाळ येथील दुर्घटना!
निलंगा (Electric Shock) : मांजरा नदीकाठी असलेल्या शेतातील तुटलेल्या विद्युत तारांचा शाॅक लागून तालुक्यातील हंचनाळ येथील शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि 17) घडली. मागच्या 2 दिवसापासून पडत असलेल्या वादळी पावसाने मांजरा नदीला पूर येऊन नदीकाठच्या शेतात पाणी शिरुर शेतीपिकाचे मोठे नुकसान झाले तर अनेक ठिकाणी विद्युत खांब कोलमडून पडले आहेत. तालुक्यातील हंचनाळ येथील शेतकरी अशोक भानुदास बिरादार हे रविवारी दुपारी शेताकडे जाऊन येतो म्हणून गेले होते. सायंकाळी ते शेतातून घरी आले नाहीत. फोनही उचलत नसल्याने घरच्यांनी शेताकडे जाऊन बघितले तर विद्युत पुरवठा करणारी तार त्यांच्या हातात आढळून आली. करंट लागून त्यांचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले. नातेवाईकांनी तात्काळ त्यांना अंबुलगा बु. येथील शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले. शवविच्छेदनानंतर सोमवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई वडील, पत्नी, दोन मुली असा परिवार आहे.
महावितरणवर सदोष मनुष्यधाचा गुन्हा दाखल करा!
या भागात मागच्या अनेक वर्षांपासून विद्युत पुरवठा करणाऱ्या तारा व खांब झुकले होते. वारंवार महावितरणाला (Mahavitrana) कळवूनही त्यांनी लक्ष दिले नाही. त्यांच्या हलगर्जीपणामुळेच एका शेतकऱ्याला जीव गेला. तारा तुटल्या असतानाही विद्युत प्रवाह खंडित का? करण्यात आला नाही असा प्रश्न येथील मिलन बिरादार यांनी उपस्थित केला. महावितरणच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल (Filed a Case) करून मयत शेतकरी अत्यन्त गरीब कुटुंबातील असल्याने त्यांच्या परिवाराला आधार म्हणून प्रशासनाने तातडीने मदत करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.