निलंगा (Latur):- औराद शहाजानी ते शेळगी-ताडमुगळी या रस्त्याचे काम रखडले असून या रस्त्यावरचे दुभाजकही अनेक ठिकाणी वेडेवाकडे झाले आहे. या रस्त्यावरून दररोज एस टी बसेस(S.T bus), चारचाकी, दुचाकी वाहनाने प्रवाशी प्रवास करीत असतात, तर याच मार्गावरून शेजारील राज्यातही बस वाहतूक व दळण-वळण होत असते. याचप्रमाणे ग्रामीण भागातील शाळा कॉलेजसाठी येणारे विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या प्रमाणात प्रवास करीत असतात. सध्या या मार्गावर एखादी मोठी दुर्घटना होऊन जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही..
औराद-ताडमुगळी रस्त्याचे काम रखडले!
या रस्त्याचे औरादजवळ अंदाजे १ कि.मी.चे डांबरीकरण काम झाले नसताना व रस्ता दुभाजकाचेही काम अपूर्ण असताना हे काम रखडले आहे. औराद ते ताडमुगळी रस्ता दर्जोन्नतीचे ७ कि.मी लांबीचे १४ कोटींचे हे काम आहे. या कामाची सुरुवात १८ जुलै २०२३ रोजी झाली. निलंगा सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत डांबरीकरण झालेला हा रस्ता अतिशय निकृष्ट दर्जाचा झाला असून या मार्गावर अनेक ठिकाणी रस्ता खचलेला व उखडलेला आहे. रस्त्याचे काम रखडल्याने या मार्गावरून वाहने चालविणे कठीण झाले आहे. त्यामुळे हा रस्ता तात्काळ पूर्ण करावा अशी मागणी या भागातील प्रवाशांमधून होत आहे.
निलंगा सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत डांबरीकरण झालेला हा रस्ता अतिशय निकृष्ट दर्जाचा
दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाचे (Public Works Department) शाखा अभियंता प्रेमकुमार आर. राठोड यांना याबाबत विचारले असता ते म्हणाले की, सदरील रस्त्यावरील विद्युत डी.पी. व विद्युत पोल हटविण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने म.रा.विद्युत पारेषण कंपनीकडे लेखी मागणी केलेली आहे. कंपनीने या कामासाठी तीस लाख रुपयांचे अंदाजपत्रक दिले आहे. या निधीसाठी मंत्रालयात प्रस्ताव दाखल करण्यासाठी तयार केला आहे. प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर प्रत्यक्ष कामास सुरुवात करणार आहोत.