– प्रकाश पोहरे
आणीबाणी म्हणजेच ” इमर्जन्सी ” (Emergency)वर भाजपाची हिमाचलप्रदेशच्या मंडी या मतदारसंघाची खासदार कंगना रानौत हिचा एक दोन वर्ष्यांपासून रेंगाळलेला “इमर्जन्सी” चित्रपटाचा माझे मित्र ना. नितीन गडकरी ह्यांनी “मुद्दाम” आयोजित केलेला विशेष खाजगी शो पत्रकार शैलेष पांडे मार्फत केलेल्या आग्रहाच्या निमंत्रणामुळे ११ जानेवारी २०२५ रोजी “इमर्जन्सीने” पाहण्यात आला. शो करिता कंगना रानौत, अनुपम खेर हे सुद्धा हजर होते. यामधे “इमर्जन्सी” ला प्रत्यक्ष साक्षी असणारे, पाहणारे व अनूभवणारे माझ्यासारखे जेष्ठ नागरिक व वरिष्ठ पत्रकार, त.भा. माजी संपादक लक्ष्मणराव जोशी, हितवादचे राजन पुरोहित, म.टा. चे श्रीपाद अपराजीत, लोकमतचे श्रीमंत माने सह अनेक संपादकाना आवर्जून निमंत्रण होते.
खरे म्हणजे गांधी आणि नेहरु घराण्याला बदनाम करण्याची किंवा त्यांची प्रतिमा मलीन करण्याची मनिषा बाळगत हा चित्रपट निर्माण केल्या गेला. मात्र म्हणतात ना करायला गेले काय आणि झाले उलटे पाय असाच प्रकार चित्रपट पाहिल्यानंतर लक्ष्यात येईल. इंदिरा गांधीच्या विरोधात जातिल असे काही प्रसंग त्यांना सापडलेच नाहीत असे दिसते. स्वत: अटल बिहारी वाजपेई यांनी इंदिरा गांधी यांना आर्यन लेडी असे म्हटलेले आहे. निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर इंदिरांजींनी जेव्हा सरकारी निवास सोडल तेव्हा त्यांनी त्यांच्या घरातील नोकरांना दोन महिन्याचा पगार दिला. जेव्हा त्याबद्दल नोकरांनी त्यांना कारण विचारले तर त्यांनी स्पष्ट केले की त्यानंतर त्या पगार देवू शकणार नाहीत. एव्हढी वाईट परिस्थिती त्यांच्यावर आली होती, आणि आताचे नेते….?
इमर्जन्सी हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी कदाचित भाजपा आणि संघा च्या लोकांनी बघितला असावा. म्हणूनच तर तो आजवर सेंसरबोर्डाच्या माध्यमातून अडकवून ठेवला नसावा ना! अशी शंका घ्यायला भरपुर वाव आहे. जर हा चित्रपट निवडणुकिच्या अगोदर प्रदर्शित झाला असता तर लोकांचा झुकाव हा काँग्रेस कडे असता. या आधी कश्मिर फाईल, केरला स्टोरी सारखे चित्रपट काँग्रेस विरोधी लोकभावना वाढवणारे होते, मात्र इमर्जन्सी हा चित्रपट इंदिरा गांधीची पर्यायाने काँग्रेसची आणि गांधी घराण्याची प्रतिमा अजूनच मजबूत करतो. इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारतात लागू केलेली आणीबाणी हा स्वतंत्र भारताच्या राजकीय इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा आणि वादग्रस्त अध्याय मानला जातो. या काळात भारतीय राज्यघटनेतील कलम ३५२ चा वापर करून देशात आपातकालीन परिस्थिती घोषित करण्यात आली. जनसामान्यांकारिता इमर्जन्सी म्हणजे एक अनुशासन पर्व होते. त्याकाळात सगळे कसे सुतासारखे सरळ चालले होते. रेल्वे, वेळेवर धावत होत्या. सरकारी कर्मचारी वेळेपूर्वी म्हणजेच १० वाजताच आपल्या कार्यालयात हजर राहत होते आणि जनतेची कामे त्वरित करत होते.
आपातकाल अर्थात “इमर्जन्सी” समजून घेण्याआधी आणि “इमर्जन्सी” चित्रपट पाहण्यापूर्वी त्याची पाश्वभूमी समजणे तितकेच गरजेचे आहे.१९७० च्या दशकात भारतातील सामाजिक, आर्थिक आणि राजकीय परिस्थिती प्रचंड ढवळून निघाली होती किंवा तशी वेळ नियोजन पूर्वक तयार केल्या गेली होती. १९७१ मध्ये झालेल्या बांगलादेश युद्धामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा ताण पडला . १९७३ चे तेलसंकट जे आंतरराष्ट्रीय स्तरावर इंधनाच्या किंमतीत झालेल्या वाढीमुळे निर्माण झाले होते आणि देशांतर्गत महागाई यामुळे जनतेत नाराजी होती. त्यावेळी जनता पार्टिचे जयप्रकाश नारायण आणि अटल बिहारीं वाजपेयी, जॉर्ज फर्नांडिझ यांचे नेतृत्वात भ्रष्टाचार, महागाई आणि बेरोजगारी विरोधात सुरू झालेल्या जनआंदोलनाने इंदिरा गांधी सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभे केले . १२ जून १९७५ रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयाने इंदिरा गांधींची १९७१ च्या निवडणुकीतील विजय अमान्य ठरवत त्यांच्यावर सहा वर्षांसाठी निवडणूक लढवण्यास बंदी घातली. या निर्णयाने इंदिरा गांधींना धक्का बसला.
इंदिरा गांधींनी दावा केला की देशात अराजकता माजली असून लोकशाही धोक्यात आहे. त्यांनी राष्ट्राच्या सुरक्षेसाठी आणि स्थिरतेसाठी आणीबाणी गरजेची असल्याचे सांगितले. प्रत्यक्षात, आपल्या सत्तेचे अस्तित्व टिकवण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतल्याचा आरोप करण्यात आला. भाजपा म्हणते की आणीबाणी हा स्वतंत्र भारताचा अध्यायाचा काळा दिवस, ज्याने लोकशाहीला होरपाळून टाकले. जनतेच्या मूलभूत हक्कांवर अंकूश लादले, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, पत्रकारिता स्वातंत्र्य आणि सार्वजनिक सभांवर निर्बंध घालण्यात आले. यामधे लाखाचे वर लोकांना अटक केल्या गेली, ज्यामधे जयप्रकाश नारायण, अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण आडवाणी यांसारख्या भारतभरातील हजारो नेत्यांना तुरुंगात डांबण्यात आले.
“मेंटेनन्स ऑफ इंटरनल सिक्युरिटी ऍक्ट (MISA)” च्या माध्यमातून अटकप्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली. संजय गांधींच्या पुढाकाराने लोकसंख्या नियंत्रणाच्या नावाखाली बळजबरीने नसबंदी करण्यात आली. विरोधी आवाज दडपला गेला, प्रसारमाध्यमांवर कडक सेन्सॉरशिप लावण्यात आली. २१ मार्च १९७७ रोजी आणीबाणी उठवण्यात आली आणि पुढे झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला. इंदिरा गांधी यांना सत्तेतून पायउतार व्हावे लागले.चित्रपट पाहताना अशा ऐतिहासिक प्रसंगांचे चित्रण थरकाप उडवते. कंगना रानावत (Kangana Ranaut) *’इमर्जन्सी’ चित्रपटाची निर्माती, दिग्दर्शक, आणि मुख्य नायिका आहे, थोडक्यात म्हणजे “सबकुछ” कंगना. अभिनेत्री आणि दिग्दर्शक म्हणून तिने अतिशय प्रभावी काम केले आहे. वेळेची मर्यादा लक्षात घेता चित्रपट पडद्यावरून झरझर समोर जातो. अनेक ठिकाणी ‘सिनेमॅटिक लिबर्टी’ लिहून कंगनाणे आवश्यक खबरदारी घेतली आहे. चित्रपटातील अनेक व्यक्तिरेखा नवीन पिढीच्या लक्षात येणार नाहीत, त्याकरिता त्या व्यक्तिरेखांचे नाव टाकण्यात आले असते तर बरे झाले असते. कंगनाच्या खात्यावर यापूर्वी अनेक वादग्रस्त चित्रपट आलेले आहेत. एका भाजप खासदाराने हा चित्रपट तयार केला असल्याने गांधी घराणे आणि विशेषतः इंदिरा गांधींची संपूर्ण नकारात्मक प्रतिमाच असेल, हा कयास बांधून चित्रपट बघायला जाणाऱ्यांना ‘इमर्जन्सी’ मोठा धक्का देतो.
जयप्रकाश नारायण (Jaiprakash Narayan) यांची दिलगिरी मागण्यासाठी इंदिरा गांधी यांनी घेतलेली भेट यात ठळकपणे आली आहे. राजकीय विरोधकांसोबत किती आदराने वागायला हवे, लोकसभेमध्ये कशा पद्धतीने बोलायला हवे, असे अनेक ठळक प्रसंग आणि उदाहरण या चित्रपटात दाखविण्यात आलेली आहेत, जी नवी पिढी निश्चितच लक्षात घेईल. सध्याच्या नेतृत्वाची आणि त्या काळातील नेतृत्वाची तुलना करतील. आणीबाणीने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांवर घोर प्रहार केला होता, मात्र कंगनाच्या चित्रपटात संघाबद्दल अवाक्षरही नाही, ही गोष्ट बरेच काही सांगून जाते.
अलाहाबाद हायकोर्टामध्ये इंदिरा गांधी (Indira Gandhi) जेव्हा स्वतः प्रत्यक्ष हजर होतात आणि त्या कोर्टात त्यांच्यावर केलेले किरकोळ आणि हास्यास्पद आरोप आणि आता सध्या निवडणुकांमध्ये केल्या जात असलेली नियमांची घनघोर पायमल्ली ठळकपणे लक्षात येते. कोर्टातील तो प्रसंग कंगनाने अतिशय प्रभावीपणे साकारला आहे. संजय गांधींने (Sanjay Gandhi) आणीबाणीचे काळात केलेली जामा मस्जिद जवळील अतिक्रमाची बुलडोजर द्वारे केलेली सफाई आणि आता योगी आदित्यनाथद्वारे (Yogi Adityanath) बुलडोजरद्वारे जी सफाई केली जाते तिची तुलना ठळकपणे लक्षात येते. नसबंदी करिता जोर जबरदस्ती केलेली दाखवली आहे मात्र ती दाखवत असताना जो अतिरेक करण्यात आलेला आहे तो फिल्मी आणि हास्यास्पद वाटतो.
जयप्रकाश नारायण, अटलजी, जॉर्ज फर्नांडिस इत्यादी अनेक नेत्यांना ज्या पद्धतीने या चित्रपटामध्ये तुरुंगात डांबलेले दाखवले ते चित्रपट पाहतांना कुणालाच पटणार नाही. प्रत्यक्षात जयप्रकाश नारायण यांना तर अटक करून तुरुंगात ठेवलेलेच नव्हते तर घरामध्येच नजर कैद करून ठेवले गेले होते, हे ज्या आमच्यासारख्या लोकांनी त्याकाळी प्रत्यक्षात इमर्जन्सी पाहिली आणि माहिती आहे त्या लोकांना तद्दन फिल्मी आणि द्वेषपूर्ण वाटते. पोलिसांमार्फत या सगळ्या राजकीय लोकांना घरून अक्षरशः गचांडी धरून पकडलेले दाखवले आणि तुरुंगामध्ये राजकीय कैद्यांचा जो छळ दाखवल्या गेला तो माझ्यासारख्या शेतकरी आंदोलनात अनेकदा तुरुंगात गेलेल्या लोकांना अतिरेकी आणि फिल्मी वाटतो, आणि त्यामुळे चित्रपटाचा उद्देश उघडा पडतो.
खलनायक आणि अँग्री यंग मॅन म्हणून खरा फोकस इंदिरा गांधींच्या (Indira Gandhi) तुलनेत संजय गांधी यांच्यावरच आलेला आहे. पुन्हा निवडून आल्यानंतर इंदिरा गांधी यांनी संजय गांधींना ज्याप्रकारे बाजूला सारले त्या सगळ्या बाबींच चित्रीकरण सुंदर झाले आहे. संजय गांधी विमान अपघातात ठार झाल्यानंतर इंदिरा त्याचा देह पाहतात मात्र डोळ्यात टिपूस येत नाही आणि संजय गांधी ठार झाला म्हणून जेव्हा दिल्लीच्या रस्त्यावर लोक ढोलताशे घेऊन नाचतात हे पाहिल्यानंतर कर्तव्य कठोर इंदिरा गांधी यांच्यातील आईने जो हंबरडा फोडलाय तो प्रसंग अतिशय म्हणजे अतिशय प्रभावी दाखवला आहे. कंगना रणावत (Kangana Ranaut) ने साकारलेली इंदिरा निडर आहेच; पण काहीशी भावना प्रधान वाटते. फिरोज गांधी आणि त्यांच्या सोबतचे प्रसंग छान वठले आहेत. लहानपणची इंदिरा आणि त्या वेळचे तिच्या घरातील वातावरण आणि तिची त्यामुळे झालेली जडणघडणं उत्तम साकारली आहे. पंडीत नेहरू आणि तिच्यामधील अनेक प्रसंगाचे चित्रीकरण उत्तम झाले आहे.
इमर्जन्सी (Emergency) उठविल्या नंतर झालेल्या निवडणुकीत पराभवानंतर १९७७ मधे इंदिरा गांधीं जेव्हा बिहारमधील बेलची गावाला जातात तेव्हा फॉरेस्ट गार्ड त्यांची गाडी अडवतो त्यावेळेला त्यांनी हत्तीवरून त्या गावाला भेट देऊन दंगलग्रस्त भूमिहीन दलितांचे अश्रू पुसले तो प्रसंग अतिशय परिणामकारकपणे साकारण्यात आला आहे. आधी रोटी खायेंगे, इंदिरा को लायेंगे या घोषणेचा जन्म तिथे कसा झाला हे अतिशय प्रभावीपणे दाखविण्यात आले आहे.
त्यामुळे सध्या मणिपूरचा वणवा पेटलेला असतांना तेथे भेट टाळणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना लगेच लक्षात येते. बेलची गावाच्या जाळपोळीचे प्रभावी चित्रांकन दाखवून कंगनाला भाजपा नेतृत्वाला आवाहन तर करायचे नाही ना, अशी शंका येते. ‘इमर्जन्सी’ चित्रपट पाहिल्यानंतर आता कंगना मोदींच्या हिटलिस्टवर राहते की इंदिरा गांधींची इमेज अजूनच चांगली केल्या बद्दल भविष्यात तिला त्याची किंमत चुकवावी लागेल याकडे चित्रपट रसिक, राजकीय वर्तुळ आणि विशेषतः संघ लक्ष ठेवून असेल हे मात्र निश्चित.
चित्रपट पाहतांना इंदिरा गांधीच्या वेळची परिस्थिती आणि आजची परिस्थिती याची तुलना केल्याशिवाय राहवत नाही.त्यावेळी परिस्थिती अशी होती की काँग्रेसच्या कुठल्याही कार्यावर भाजप नुसते विरोध आणि विरोधच करत असत. उदा. मनरेगा असो , आधार कार्ड असो वा जीएसटी असो, भाजपाने सत्तेत येताच ते बंद न करता अगदीच घिसाडघाईने आणि जुलमी पद्धतीने लागू केले भाजपाच्या महीला मृणालताई गोरे,अहिल्या रांगणेकर, शोभा फडणवीस तर बेस्ट बसचे पाच पैसे टिकिट वाढताच रस्त्यावर उतरत, स्मृती ईरानी (Smriti Irani) तर गॅस सिलेंडरचे ५ रुपये भाव वाढताच सिलेंडर डोक्यावर घेऊन धूमाकूळ घालत. विरोधकांच्या संदर्भामध्ये आज ज्या पद्धतीने सूड उगविण्याचे काम केले जाते आणि महत्त्वाच्या बाबींवरून लक्ष दुसरीकडे वेधण्याकरिता जे प्रकार केल्या जातात ते प्रकर्षाने लक्षात घ्यावेच लागेल.इंदिरा गांधींनी ज्या प्रकारे बांगलादेशची निर्मिती केली त्यावेळची त्यांची कठोर भूमिका, जनरल मानेक शॉ ह्यांची भेट, अमेरिका, रशिया इत्यादी देश्यांच्या भेटी आणि त्यावेळी त्यांनी घेतलेल्या ठाम भूमिका उत्कृष्ट पणे साकारल्या आहेत आणि आज मोदीजींच्या विदेश भेटी ह्यातील फरक प्रकर्षाने लक्षात येतो. कंगनाचा अभिनय आणि एकंदरीत चित्रपटाची भट्टी, काही फिल्मी प्रसंग वगळता, फारच छान जमली आहे. चित्रपट आवर्जून पहावा, विशेषतः काँग्रेसच्या लोकांनी.
- प्रकाश पोहरे : 98225 93921
समीक्षक आणि लेखक
दैनिक देशोन्नती मुख्य-संपादक