कारंजा (Washim):- संकटसमयी रुग्ण, त्यांचे नातेवाईक व कर्मचाऱ्यांना सुरक्षितपणे बाहेर निघता यावे, यासाठी स्थानिक उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीतून आपत्कालीन मार्ग (emergency exit)काढण्यात आला आहे. परंतु, देखभालीअभावी हा मार्गच संकटात सापडला असून, याकडे रुग्णालय प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
रुग्णालयाच्या इमारती मागून आपत्कालीन मार्ग काढण्यात आला
येथील उपजिल्हा रुग्णालय आवारात नव्याने टोलेजंग ईमारत बांधण्यात आली असून, त्यामध्ये रुग्णालयीन अनेक तपासणी कक्ष (Inspection room) सुरू करण्यात आले आहेत. येथे वेगवेगळ्या व्याधींनी त्रस्त रुग्ण भरती ठेवले जातात. याशिवाय त्यांच्यासोबत अनेकदा त्यांचे नातेवाईक देखील थांबतात. अशावेळी रुग्णालयात आग लागल्यास आणि पुढील मार्ग आगीने घेरल्यास पर्यायी मार्ग म्हणून रुग्णालयाच्या इमारती मागून आपत्कालीन मार्ग काढण्यात आला आहे. परंतु, असा प्रसंग दवाखान्यात कधीच घडणार नाही अशा अविर्भावात संबंधित अधिकारी आहेत. त्यामुळे आपत्कालीन मार्ग अडगळीत पडला असून, समोर मोठ्या प्रमाणात गवत उगवले आहे. सोबतच इतरही काडीकचरा(Garbage) तेथे आढळून येत आहे. संभाव्य संकट लक्षात घेता, रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आपत्कालीन मार्ग सुसज्ज ठेवावा, अशी मागणी होत आहे.
पायऱ्या व रॅम्पची रचना अडचणीची
आपत्कालीन मार्ग रुग्णालयाबाहेर निघत असताना एका बाजूने पायऱ्या दुसऱ्या बाजूने रॅम्प तयार करण्यात आला आहे. परंतु, याची रचना अडचणीची ठरणारी आहे. एखादवेळी रुग्णालयात आग लागल्यास अडकलेल्यांना तातडीने बाहेर काढायचे झाल्यास पायऱ्या व रॅम्पवरून खाली आणणे अडचणीचे ठरणारे आहे. वास्तविक पाहता आपत्कालीन मार्ग लहान आकाराचा असून वेळप्रसंगी तेथे रुग्णवाहिका उभी करताना संबंधितांना अडचणीचे ठरणार असल्याचे दिसून येते.