परभणी(Parbhani):- शहरातील उड्डाणपुलाखाली असलेल्या पर्यायी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण (Encroachment) झाले होते. या रस्त्यावरुन ये – जा करण्यासाठी वाहनधारकांना अडचणींचा सामना करावा लागत होता. सदरची बाब लक्षात घेता शहर वाहतूक शाखेच्या पथकाने या रस्त्यावरील अस्थायी अतिक्रमणे मंगळवार २० ऑगस्ट रोजी काढली.
उड्डाणपुलाखाली राहणार्या नागरीकांनी मोठ्या प्रमाणात अस्थायी अतिक्रमणे केली आहेत
जिंतूर रोड मार्गे बसस्थानकाकडे (Bus-stand)येत असताना उड्डाणपुलाला पर्यायी मार्ग आहे. उड्डाणपुलावर गर्दी झाल्यास या मार्गाने वाहतूक वळविता येऊ शकते. मात्र सदर रस्त्यावर उड्डाणपुलाखाली राहणार्या नागरीकांनी मोठ्या प्रमाणात अस्थायी अतिक्रमणे केली आहेत. त्यामुळे या रस्त्यावरुन दुचाकी सोडली तर इतर वाहने जाणे देखील अवघड होऊन बसले होते. उड्डाणपुलावर अपघात होऊन वाहतूक कोंडी झाल्यास जिंतूर रोडकडून येणारी वाहतूक पर्यायी रस्त्याने वळविण्यासाठी मोठी अडचण जाणवत होती. ही बाब लक्षात घेता शहर वाहतूक शाखेच्या पथकाने या रस्त्यावरील अतिक्रमणे काढून रस्ता मोकळा केला. अतिक्रमण हटविण्याच्या मोहिमेत सपोनि. वामन बेले, पोउपनि. मकसूद पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचार्यांनी सहभाग घेतला.