नेर(Yawatmal):- जमिनीचे पट्टे, मूलभूत सुविधा तसेच जातीभेदापासून मुक्ती मिळावी याकरिता लढा देणाऱ्या आजंती येथील पारधी बांधवांना नेरचे प्रशासन तसेच जिल्हा प्रशासनाकडून केवळ पोकळ आश्वासनेच मिळत आहे. त्यामुळे पुरे झाला आता आश्वासनांचा खेळ आता मागण्यांच्या पूर्ततेचे लेखी पत्र घेतल्याशिवाय उपोषणातून मागे हटणार नाही असा इशारा पारधी समाजाचे सामाजिक कार्यकर्ते बबन पवार यांनी प्रशासनाला दिला आहे. आज तहसिल कार्यालयासमोर सुरु असलेल्या उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी सुध्दा प्रशासनाच्या वतीने दखल घेतली नाही.
आजंतीच्या पारधी बांधवांचा हुंकार
आजंती येथील राहत असलेल्या जमिनीचे आठ अ, घरकुल, मूलभूत सुविधा, जमिनीचे पट्टे, वैद्यकीय तसेच शैक्षणिक सुविधा (Educational facilities)आणि माणूस म्हणून जगण्याचा समान अधिकार आणि संधी मिळावी यासाठी तालुक्यातील आजंती येथील ५६ पारधी कुटुंबीय मागील चार वर्षांपासून प्रशासनाकडे पाठपुरावा करीत आहे. आजंती ग्रामपंचायतीने जमिनीचे पट्टे तसेच ८ अ देण्याबाबत आजपर्यंत ठराव घेतला नाही. २६ जानेवारीलाही आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी देखील आश्वासन मिळाले. परंतु त्याची पूर्तता करण्याचे सौजन्य अधिकाऱ्यांनी दाखविले नाही. त्यामुळे आता लेखी पत्र घेतल्या शिवाय उठणार नाही असा पारधी बांधवांनी केला आहे.