परभणी/गंगाखेड(Parbhani):- सर्प निघाल्यानंतर रात्री अपरात्री आपला जीव धोक्यात घालून साप, प्राणी व मानवांच्या जीवाचे रक्षण करणाऱ्या सर्प मित्रांच्या सेवेला अत्यावश्यक सेवेचा दर्जा द्यावा अशी मागणी दि. २६ जुलै शुक्रवार रोजी नायब तहसीलदार अशोक केंद्रे यांच्याकडे सादर केलेल्या निवेदनात अखिल भारतीय सर्पमित्र आणि प्राणीमित्र संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
तातडीने निर्णय नाही झाल्यास सर्प, प्राणी मित्रांच्या वतीने आझाद मैदान, मुंबई येथे लाक्षणिक उपोषण
घर, ऑफीस, शेत आखाड्यावर साप (snake) निघाल्यास सर्वांचा थरकाप उठतो आणि बहुतांश नागरिक सापाला मारण्यासाठी सरसावतात मात्र या सापांचे व मानवांचे जीव वाचविण्यासाठी आपला जीव धोक्यात घालून सर्पमित्र सापाला पकडतात व मानव जाती बरोबरच प्राणी तसेच सापाचेही प्राण वाचवतात. स्वतःचे जीव धोक्यात घालून हे कार्य करणाऱ्या सर्प मित्रांना मात्र कुठलेही सरंक्षण नाही व त्यांच्याकडे कोणाचे ही लक्ष नसल्याने सर्प मित्रांना शासकीय स्तरावर ओळखपत्र (Identification card) द्यावे, सर्प दंश झाल्यास अपघाताचा विमा देऊन मदत करावी, सर्प मित्रांच्या सेवेला अत्यावश्यक सेवा म्हणून मान्यता द्यावी तसेच सर्प मित्रांची माहिती देणारे व नोंदणी करणारे पोर्टल, नेटवर्क उभारावे आदी मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी विविध मागण्यांचे निवेदन दि. २६ जुलै शुक्रवार रोजी नायब तहसीलदार अशोक केंद्रे यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले असून तातडीने निर्णय नाही झाल्यास सर्प, प्राणी मित्रांच्या वतीने आझाद मैदान, मुंबई येथे लाक्षणिक उपोषण करण्यात येईल.
असा इशारा अखिल भारतीय सर्पमित्र व प्राणीमित्र संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. या निवेदनावर सर्प मित्र, प्राणी मित्र किरण भालेराव, चेतन लांडे, पंकज कांबळे, चंद्रकांत उजेड, गजानन साखरे, महेंद्र समुद्रे, मन्मथ मंदोडे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.