शिरुर अनंतपाळ (Latur) :- शिरूर अनंतपाळ तालुक्यातून 310 कोटींचा महामार्ग मंजूर झाला असून त्याचे काम तात्काळ सुरू होणार आहे, घरणी प्रकल्पातील पाणी पळवण्याचा लातूरकरांचा डाव आहे, जोपर्यंत संभाजीराव आहे, तोपर्यंत या धरणातील पाण्याचा एक थेंबही लातूरला जावू देणार नाही, असा इशारा देत माजी पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी लातूरकरांना पाणी देण्याबाबत आपली कठोर भूमिका जाहीर केली. आठ दिवसांपासून सुरू असलेल्या जनसन्मान यात्रेनिमित्त शिरूर येथे झालेल्या सभेत ते बोलत होते. यावेळी माजी केंद्रीय मंत्री (Union Minister) रावसाहेब दानवे आमदार सुरेश धस माजी खासदार रूपाताई पाटील अरविंद निलंगेकर अरविंद पाटील निलंगेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
… रेल्वे लाईनचे उद्घाटन करायला येतो!
माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी लातूर रोड ते गुलबर्गा रेल्वे मार्ग घेऊन गेल्याशिवाय सत्कार स्वीकारणार नाही, असा संकल्प केला आहे. या रेल्वे मार्गासाठी (railway line) त्यांची सर्वोच्च प्राथमिकता आहे. त्या अनुषंगाने सर्व्हेसाठी आपण टोकन अमाऊंट म्हणून 50 कोटी रुपये दिले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांना निवडून द्या, या रेल्वेमार्गाच्या उद्घाटनाला मी स्वतः येतो, असे अभिवचन शिरूर अनंतपाळ येथील जनतेला माजी केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे यांनी दिले.
आ. धसांचा संभाजीरावांना सल्ला!
माजी मंत्री आमदार सुरेश धस यांनी शेलक्या भाषणातून गुत्तेदार गँगचा चांगलाच समाचार घेतला. ही गॅंग म्हणजे कोणाचीच नसते. उगवत्या सूर्याला नमस्कार करणारे असतात, असे ते म्हणाले. मेडिकल एज्युकेशनचे माजी मंत्री आ. अमित देशमुख यांच्यावर बोलताना म्हणाले कोरोना काळात त्यांना खूप करता आले असते, परंतु विदेशात जाऊन त्यांनी संधी गमावली. संभाजीराव, वॉट्सप, फेसबुकवरील कमेंट वाचू नका, त्यांना उत्तर देऊ नका! अभिव्यक्ती स्वातंत्र्यामुळे आपणाला कोण अडचणीत आणेल, हे सांगता येत नाही असा सल्लाही शेवटी माजी मंत्री आमदार सुरेश धस यांनी दिला.