परभणी(Parbhani):- जिल्ह्यात पावसाची सुरूवात होऊन एक महिन्याचा कालावधी लोटत आहे तरी सुध्दा जिल्ह्यातील बहुतेक जलाशये (Reservoir)अजूनपर्यंत कोरडेच आहे. जिल्ह्यात असलेले निम्न दुधना प्रकल्प, येलदरी धरण, ढालेगाव बंधारा, या जलाशयांमधून जिल्ह्यातील गावांना पाणी पुरवठा होत असतो.
जिल्ह्यावर पाणीबाणीचे संकट
यंदाच्या वर्षी मागील वर्षापेक्षा अत्यल्प पाणी साठा या प्रकल्पांमध्ये राहिला असून यंदा जिल्हावासीयांवर पाणीबाणीची परिस्थिती ओढावू शकते. पाऊस न पडल्यामुळे याचा फटका शेतकर्यांसह सर्व जिल्ह्यातील नागरीकांना सहन करावा लागणार आहे. सद्यस्थितीत निम्न दुधना प्रकल्पाचा एकूण प्रकल्पीय पाणीसाठा(water reservoir) हा ३४४.८० दलघमी असून पैकी उपयुक्त २४२.२० दलघमी असतो. तर मृत पाणीसाठा १०२.६० दलघमी एवढा असतो. सोमवार १ जुलै रोजी पाणीसाठ्याची स्थिती ही एकूण १०५.९३ दलघमी एवढी असून पैकी उपयुक्त फक्त ३.३३ दलघमी एवढाच असून त्याची आजची टककेवारी ही केवळ १.३७ टक्के आहे. गतवर्षी १ जुलै रोजी ही टक्केवारी २५.९७ टक्के एवढी होती. दोन्ही टक्केवारीमध्ये तफावत पाहता पर्जन्यमान क्षेत्रामध्ये(Precipitation areas) जर पाऊस पडला नाही तर जिल्ह्यात पाणीबाणीची स्थिती उद्भवणार असल्याची चिन्हे दिसत आहे.
येलदरी धरणाचा पाणीसाठा
येलदरी धरण प्रकल्प पाणीसाठ्याची सोमवार १ जुलै रोजीची स्थिती ही एकूण पाणीसाठा ३४७.९५ दलघमी असून त्यापैकी २२३.२८ दलघमी एवढाच उपयुक्त पाणीसाठा आहे. या पाणीसाठ्याची टक्केवारी ही २७.५७ टक्के असून गतवर्षी १ जुलै रोजी ही टक्केवारी ५५.९० टक्के एवढी होती. संपूर्ण मराठवाड्यातील जलाशयांची स्थिती ही पाऊस सुरू होऊन एक महिना लोटला तरीही सारखीच दिसत आहे.