परभणी (Parbhani) :- राज्य परिवहन महामंडळ खाजगी ट्रॅव्हलच्या स्पर्धेत कोसो दूर आहे. आधीच तिकिट दरात प्रचंड भाडेवाढ केल्याने प्रवाशांनी एसटीकडे पाठ फिरवली आहे. त्यात कंडम गाड्या रस्त्यावर जून्या मोडकळीस आलेल्या बसेसच्या दुरुस्तीवर लाखो रुपये खर्च करत आहे. धूर ओकत धावणार्या बस प्रदूषणात भर घालत आहेत, शिवाय कुठे कधी बंद पडेल काही सांगता येत नाही.
रस्त्यावर जून्या मोडकळीस आलेल्या बसेसच्या दुरुस्तीवर लाखो रुपये खर्च
राज्य परिवहन महामंडळाच्या परभणी आगारातून दररोज शेकडो बस (Bus)गाड्या धावतात. लांबपल्ल्याच्या गाड्यांना देखील चांगला प्रतिसाद आहे. जिल्ह्यातंर्गत धावणार्या बहूतांश गाड्यांची अवस्था बिकट आहे. विशेषत: गंगाखेड, जिंतूर, पाथरी,बीड,हिंगोली मार्गावर सतत बस रस्त्यात बंद पडण्याच्या घटना होत असल्याचे दिसून येते. या मार्गावर धावणार्या एसटी बसेस खिळखिळ्या आणि खिडक्या, तावदाने तुटलेल्या आहेत. सीटचे कुशनही फाटलेले असते. पावसाळ्यात टपातून पाणी गळती सुरुच असते. त्यात अस्वच्छता सर्वत्र पसरलेली आणि तंबाखु, गुटक्याचा कुबट वासाने प्रवास नकोसा होतो. मात्र तरीही ग्रामीण भागातील प्रवाशी एसटी बसनेच प्रवास करण्यास पसंती देतात. बसचा प्रवास सुरक्षित समजला जातो. मात्र आता तो सुरक्षित राहिला नाही. मोडकळस आणि कालबाह्य होऊ पाहणार्या बसेस परभणी आगारातून धावतात. गुरुवार १३ फेब्रुवारी गंगाखेड रोडने धावणार्या एमएच १४ -बीटी – २३२० या क्रमांकाच्या बसने आजूबाजूने धावणार्या वाहनचालकाच्या नाकात दम आणला होता.
ही बस प्रचंड धूर (smoke)ओकत होती. तरीही बसचालक मोठ्या ऐटीत रेस करत होता. महामंडळ बसगाड्या दुरुस्तीवर कोट्यवधींचा खर्च करत असते. मात्र कायमस्वरुपी तोडगा काही काढत नाही. नादुरुस्त गाड्या घेऊन जाण्यास चालकही तयार नसतात. मात्र कर्तव्य म्हणून जावेच लागते. रस्त्यात बंद पडल्यास प्रवाशांचा रोष चालक, वाहकांनाच सहन करावा लागतो. महामंडळाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.