बुलढाणा (Gram Salaiban) : जळगाव जामोद तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या आपल्या पर्यावरणीय ग्राम सालईबनचे कार्य महाराष्ट्राच्या राजभवनापर्यंत पोहोचले आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल महामहीम श्री सी.पी. राधाकृष्णन हे शुक्रवार 4 ऑक्टोंबर 2024 रोजी बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी “तरुणाई फाउंडेशन” व “सालईबनच्या” कार्याची माहिती राज्यपाल महोदयांना देण्यासाठी खास निमंत्रण दिले होते. यावेळी मनजीत भाई व तरुणाईचे सचिव राजूभाऊ कोल्हे हे उपस्थित होते. राज्यपाल महोदयांनी तरुणाईच्या व सालईबनच्या पर्यावरणीय व शाश्वत विकासाबद्दल आस्तेवाईपणे मंजित भाईकडून माहिती जाणून घेतली.
जल, जंगल, जमीन, जानवर आणि जन यावर सुरू असलेले काम प्रशांशनीय असून शासनासोबत सामाजिक संस्था व कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे कामे केल्यास निसर्ग संवर्धनाचे काम खूप चांगल्या पद्धतीने होईल. शासकीय यंत्रणा तरुणाई व सालईबन च्या कार्याला नेहमी पाठबळ देईल असे मत महामहीम राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी व्यक्त केले. तरुणाईच्या वतीने राजूभाऊ कोल्हे यांनी सालईबनमध्ये साकारलेल्या भव्य कलाकृतीची प्रतिमा माननीय राज्यपाल महोदयांना मंजितभाई यांच्याहस्ते भेट देण्यात आली.
बुलढाण्यातील विश्रामभवनात झालेल्या या कार्यक्रमात जिल्हाभरातील विविध स्वयंसेवी संस्था, उद्योजक व खेळाडू यांच्यासोबतही राज्यपाल महोदयांनी संवाद साधला. आपल्या महाराष्ट्रातील सर्वोच्च स्थानी असलेले माननीय राज्यपालांची भेट तरुणाईसाठी निश्चितच अभिमानास्पद असून भविष्यातील पर्यावरणीय कामासाठी आपल्या सर्वांना प्रेरणादायी ठरणारी असेल. तरुणाई व सालईबनच्या कार्याची माहिती पुस्तिका माननीय राज्यपाल महोदयांना देण्यात आली. यासाठी तरुणाई सचिव उमाकांत कांडेकर, वनपरिक्षेत्र अधिकारी किशोर पडोळ, बुलढाणा येथील डॉ. शिवाजी देशमुख, सचिन ठाकरे यांनी सहकार्य केले.