चिखली (Buldhana) :- अंगणवाडी शाळेत सकाळी १० वाजेच्या दरम्यान अचानक साप (snake) आढळून आल्याने चिमुकल्या मध्ये एकच खळबळ उडाली. मात्र कोणत्याही प्रकारची जिवीत हानी झाली नाही परंतु चिमुकल्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
जिवीत हानी झाली नाही परंतु चिमुकल्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला
चिखली तालुक्यातील मेरा खुर्द येथे चार ते पाच अंगणवाडी शाळा आहेत. त्यामध्ये अंगणवाडी क्रमांक ३ ही गावालगत समाज मंदिरात भरते. या अंगणवाडी शाळेवर सेविका नर्मदा मस्के व मदतनीस भागीरथी काळे या कार्यरत आहेत. या अंगणवाडी (Anganwadi) केंद्रात जास्तीत जास्त मुस्लिम समाजाची मुले शिक्षण घेतात. परंतु अंगणवाडीला वर्ग खोलीच नसल्याने मेरा खुर्द ग्रामपंचायतीने एक समाज मंदिर खुले करूण दिले. त्यामुळे या समाज मंदिरात चिमुकले दररोज शिक्षण घेतात परंतु, या खोलीच्या पाठीमागील बाजूला संरक्षक भिंत नसल्याने अनेकजण घाणकचरा आणून टाकत असल्याने त्या ठिकाणाहून रात्रंदिवस उंदीर, घूस, पाली सतत वर्गाच्या आत-बाहेर प्रवेश करतात.अशा या घाणीच्या साम्राज्यामुळे ५ ऑक्टोबर रोजी सकाळी शाळा भरल्यानंतर काही मिनिटांतच सापाने खिडकीतून वर्गात अचानक उडी मारली आणि चिमुकल्यांची एकच धावपळ उडाली हा प्रकार पाहून अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची सुध्दा चांगलीच घाबरगुंडी झाली यांनी लगेच त्यांनी मुलांना डेक्स बेंच वर बसण्याचे सागितले.
साप, उंदीर आणि घुशींच्या साम्राज्यातच आपला जीव मुठीत धरून शिक्षण घ्यावे लागणार
साप साप असे आरडा ओरड झाल्याने शेजारी धावत येवून सापाला बाहेर काढले परंतु त्यामध्यें कोणत्याही प्रकारची जिवीत हानी झाली नाही अनर्थ टळला. मात्र अशी घटना पुन्हा घडू शकते असा प्रश्न निर्माण झाल्याने अंगणवाडीत शिक्षण घेत असलेल्या चिमुकल्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. परंतु जोपर्यंत नवीन वर्ग खोली बांधली जात नाही, तोपर्यंत या निरागस चिमुकल्यांना अशा साप, उंदीर आणि घुशींच्या साम्राज्यातच आपला जीव मुठीत धरून शिक्षण घ्यावे लागणार आहे हे मात्र खरे .