नवलच!…… बुटीबोरीतील उड्डाणपुलावरील गडर घसरले
साडे तीन वर्षातच गुणवत्तेचं पितळ उघडे,अनर्थ टळला
२०० वर्षांच्या हमीवर प्रश्नचिन्ह
राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीचा खोळंबा
तालुका प्रतिनिधी
नागपूर (Butibori Bridge Crack) : नागपूर -चंद्रपूर राष्ट्रीय महामार्गावरील बुटीबोरी शहरातील मुख्य चौकात वारंवार होणारे अपघात व वाहतुकीची होणारी कोंडी यावर नियंत्रण मिळविण्यासाठी बुटीबोरील स्थानीय नेते व व्यापारी यांनी लावलेल्या तगादया मुळे व लोकप्रतिनिधिंच्या पाठपुराव्यातून राष्ट्रीय महामार्ग ७ वरील बुटीबोरी मुख्य चौकात राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण व सडक परिवहन द्वारे १. ६९ किलोमीटर लांब व २४ मिटर रुंद अशा उड्डाणपुलाचे निर्माण ६९ करोड रुपये खर्च करून आला.
या उड्डाण पुलाला २०० वर्ष काहीच होणार नसल्याची हमी दस्तूरखुद्द केंद्रीय सडक परिवहन व राजमार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली होती. मात्र अवघ्या साडे तीन वर्षातच उडान पुलाच्या (Butibori Bridge Crack) हमीचे पितळ उघडे पडले असून या उडान पुलाच्या जवळपास ११ सहाय्यक बीमांना धोकादायक अशा भेगा पडून त्यावरील काँक्रीट खाली कोसळल्याची खळबळजनक घटना आज सकाळी घडली. प्रसंगावधानाने ही गंभीर बाब लक्षात येताच पोलीस प्रशासनाने त्वरित दखल घेत उडान पुलावरील वाहतूक तात्काळ बंद करन ती सेवा रस्त्यावरून वळती केली.
यामुळे सकाळपासून राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून वाहतुकीचा पुरता खोळंबा होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. बुटीबोरी शहर हे औद्योगिक शहर म्हणून ख्यातिप्राप्त आहे .शिवाय हे शहर (Butibori Bridge Crack) राष्ट्रीय महामार्गावर स्थित असल्याने येथील मुख्य चौकात वारंवार होत असलेले अपघात आणि वाहतुकीची होत असलेली कोंडी यावर अंतिम पर्याय म्हणून ६९ कोटी रुपयांच्या निधीतून १. ६९ किलोमीटर लांबीचा भव्य असा उडाणपूल बांधण्यात आला.या पुलाचे कंत्राट टी एन टी कंपनीला देण्यात आले होते .सदर पुलाच्या बांधकामाचे भूमिपूजन तत्कालीन तथा विद्यनान केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते करण्यात आले होते.
त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सह अनेक दिग्गज नेत्यांची सुद्धा उपस्थिती होती.भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी गडकरी यांनी बांधकामाचे कंत्राट असलेल्या टी एन टी कंपनीच्या कामाच्या गुणवत्तेबद्दल भरसभेत स्तुतिसुमने उधळत उडान पुलाच्या मजबुतीची २०० वर्षांची हमी देखील भरली होती. या (Butibori Bridge Crack) उड्डाणं पुलाच्या बांधकामला दि.१ डिसेंबर २०१८ रोजी सुरूवात केली होती आणि अखेर बांधकामाच्या पूर्णत्वास विराम लागून दि.१७ जून २०२१ रोजी खुद्द गडकरी यांचे हस्ते या पुलाचे लोकार्पण करण्यात आले होते. त्यामुळे उडान पुलावरून सुरु झालेल्या वाहतुकीमुळे स्थानिक नागरिकांना तसेच इतर वाहतुकदारांना तूर्तास दिलासा मिळाला होता.
मात्र अवघ्या साडे तीन वर्षातच उडान पुलाच्या हमीचे पितळ उघडे पडले असून आज दि २४ डिसेंबर ला सकाळी उडान पुलाच्या जवळपास सपोर्टींग बिमांना (गडर) ला तडा जाऊन त्यातील काँक्रीट खाली कोसळ्याने एकच खळबळ उडाली. बिमांना (गडर) तडा गेल्यामुळे (Butibori Bridge Crack) उडान पूल हा अंदाजे ८ ते १० इंच खाली धसला.ही गंभीर बाब तात्काळ लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला.कारण हा चौक सदाणकदा वाहतूक व नागरिकांच्या गर्दीने फुललेलाच असतो.स्थानिक पोलिसांनी घटनेच गांभीर्य लक्षात घेत सावधानीचा पवित्रा घेतला व लगेच उडापुलावरील वाहतूक बंद करून संपूर्ण वाहतूक ही सेवा रस्त्यावरून वळती केली.प्रसंगी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून वाहतुकीचा पुरता खोळंबा बघायला मिळत आहे.
देखभाल दुरुस्तीकडे कायमचे दुर्लक्ष
सदर उडान पुलाच्या (Butibori Bridge Crack) लोकार्पणानंतर उडान पूल तसेच त्याच्या संलग्नित असलेल्या १. ६९ किलोमीटर लांब सेवा रस्त्याचा ५ वर्षांच्या देखभाल दुरुस्तीचा करार कंत्राटदार टी एन टी कंपनीकडे होता.मात्र त्यांच्याकडून देखभाल दुरुस्ती कडे होत असलेल्या दुर्लक्षा मुळेच आजचा प्रसंग घडला असल्याची चर्चा सध्या परिसरात सुरू असून संबंधित कंत्राटदार कंपनीवर प्रशासन काय कार्यवाही करणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
वर्षाभरात सेवा रस्त्याचे तीन तेरा
उडान पुलाच्या बांधकाम संलग्नित १. ६९ किलोमीटर लांबीच्या सेवा रस्त्याचे कंत्राट सुद्धा टी एन टी कंपनीकडेच होते. त्याचे सुद्धा लोकार्पणानंतर अवघ्या एक वर्षातच तीन तेरा झाले.यामुळे रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नेहमीच अपघात सदृश परिस्थिती निर्माण होऊन अनेकदा अपघात देखील झाले आहेत.
संबंधित प्रशासनातील बडे अधिकारी घटनास्थळी
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस प्रशासनासह महामार्ग प्राधिकरणाचे तसेच इतर संबंधित प्रशासनातील बडे अधिकारी याशिवाय खुद्द टी एन टी कंपनीमधील जबाबदार अधिकारी देखील घटनास्थळी हजर झाले होते. त्याचबरोबर खुद्द नागपूरचे जिल्हाधिकारी सुद्धा घटनास्थळी भेट घेण्यासाठी येणार असल्याची माहिती असून वृत्त लिहितोवर त्यांच्या भेटीची कसलीही माहिती मिळाली नाही.
मोहन भागवत यांचा रस्ता वळवीला
राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचे प्रमुख मोहन भागवत हे आज बुटीबोरी मार्गे चंद्रपूरला जाणार होते. परंतु उड्डाणंपुलाच्या गडर ला तडा गेल्याने, (Butibori Bridge Crack) उड्डाणपूलावरील वाहतूक सेवा बंद करून सेवा रस्त्याने वळती केली. त्यामुळे बुटीबोरी येथे वाहतुकीची कोंडी होत असल्याने, भागवत यांना नागपूर वरून समृद्धी महामार्गे दाताळा वरून वळण घेऊन वर्धा मार्गावरील एसीसी चौकातून चंद्रपूर असे वळते करण्यात आले.