परभणी (Parbhani) :- शहरातील एका मेडिकल व्यापार्यास मुलगा आणि नातवाला जीवे मारु टाकू, अशी धमकी देत २५ लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली आहे. व्यापार्याच्या मोबाईलवर आणि व्हॉट्सअॅपवर(WhatsApp) संदेश टाकत खंडणीची मागणी करण्यात आली. या प्रकरणी व्यापार्याने दिलेल्या तक्रारीवरुन अनोळखी मोबाईल क्रमांक धारकावर ३० जुलै रोजी नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नातु, मुलाला ठार मारण्याची दिली धमकी
अनंत नलबलवार यांनी तक्रार दिली आहे. फिर्यादीचा परभणीत मेडिकल व्यवसाय(Medical profession) आहे. त्यांना दोन मुले असून मोठा मुलगा त्याच्या कुटूंबासह पुणे येथे वास्तव्यास आहे. २८ जुलै रोजी रात्री दहाच्या सुमारास फिर्यादी घरी असताना त्यांच्या मोबाईलवर एका अनोळखी क्रमांकावरुन फोन आला. संबंधिताने फिर्यादीला तु मला २५ लाख रुपये दे, नाहीतर तुझा पुणे येथील मुलगा किंवा नातु या पैकी एकाला ठार करेल, हे दोघे आमच्या रडावर आहेत, असे म्हणत धमकी दिली. पोलिसांना किंवा मुलांना कॉल केला तर त्यांची लाश पाहावी लागेल, असे धमकावले. संबंधिताने फिर्यादी च्या मोबाईलवर मुलगा, नातुचे फोटो, घराचे फोटो टाकले. यामुळे फिर्यादी घाबरले. त्यानंतर २९ जुलैला दुपारी पुन्हा फोन आला. आज रात्रीपर्यंत मला माझे उत्तर पाहिजे, पैसे देतो का नाही, असे म्हणत धमकावण्यात आले. २५ लाख रुपये खंडणी वसूल करण्याच्या उद्देशाने फिर्यादीस धमकावणे, त्यांचा मुलगा, नातवाला जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी संबंधित मोबाईल(Mobile) धारकावर नवा मोंढा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवा मोंढा पोलीस अधिक तपास करत आहेत.