परभणी (Parbhani):- खोटे व बनावटी अल्पसंख्यांक दर्जा प्रमाणपत्र तयार करुन शासनाची आर्थिक फसवणूक(financial fraud) करणार्यांवर न्यायालयाच्या आदेशाने २१ जुलै रोजी नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (crime filed) करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये संस्थाध्यक्ष, उपाध्यक्ष, कोषाध्यक्ष, सचिव, सहसचिव, सदस्यांचा समावेश आहे.
सक्षम प्राधिकारी तथा सहसचिव अैनुल अतार यांची स्वाक्षरी जशास तशी खोट्या प्रमाणपत्रावर दिसून येते
या बाबत तक्रारदार शेख खाजा जमिल मोहियोद्दीन यांनी न्यायालयामध्ये दाद मागितली होती. परभणी शहरातील एकबाल नगर येथील आझाद एज्युकेशन अॅण्ड वेलफेअर सोसायटी या संस्थेला अल्पसंख्यांक दर्जा प्रमाणपत्र क्रमांक १०८ अल्पसंख्यांक मंत्रालय (Ministry) मुंबई यांच्याकडून १४ फेबु्रवारी २०१४ रोजी प्रदान करण्यात आले होते. परंतु सदर संस्थेने प्रमाणपत्र क्रमांक १०८ च्या आधारे समता जागृती ललित मंच या संस्थेच्या नावे खोटे व बनावटी अल्पसंख्यांक दर्जा प्रमाणपत्र क्रमांक १०९ तयार करुन शासनाची आर्थिक फसवणूक(financial fraud) केली. संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व इतरांनी कट रतच संगणमत करुन बनावट प्रमाणपत्र तयार करत शैक्षणिक संस्था(educational institution) टाकून शासनाच्या पैशांचा मोठ्या प्रमाणात अपहार केला आहे.
बनावट अल्पसंख्यांक प्रमाणपत्राच्या आधारे शासनाची, सामान्य जनतेची फसवणूक
या बाबत तक्रारदाराने सुरुवातीला पोलिसांकडे तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला. मात्र दाद न मिळाल्याने त्यांनी अॅड. एम.डी. शाहेद यांच्या मार्फत न्यायालयामध्ये अर्ज दाखल केला. न्यायालयाच्या आदेशाने संबंधितांवर २१ जुलै रोजी नवा मोंढा पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बनावट अल्पसंख्यांक प्रमाणपत्राच्या आधारे शासनाची, सामान्य जनतेची फसवणूक करत समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद यांच्याकडून विविध प्रकारच्या योजनांचा बेकायदेशीरपणे आर्थिक लाभ घेतला. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शासनाकडून मिळणार्या आर्थिक लाभाचा पण अपहार केला आहे. या संस्थेंतर्गत असलेल्या शाळेत शासनाने विहित केलेली बिंदू नामावली व आरक्षणाविषयीचे कायदे लागु असताना याचे उल्लंघन करत पात्र लाभार्थ्यांचे हक्क डावलण्यात आले. बेकायदेशीरपणे कर्मचार्यांची प्रशासकीय मान्यता देखील समाज कल्याण विभाग जि.प. परभणीकडून मिळविली आहे.
खोटे व बनावटी अल्पसंख्याक दर्जा प्रमाणपत्र तयार करुन संस्थेच्या नावाखाली शाळा टाकत शासनाची आर्थिक फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी संस्थाध्यक्ष नसीम अख्तर नियामत खान, उपाध्यक्ष आयेशा कौसर अली शाह खान, सचिव अली शाह खान आझाद खान, सहसचिव इम्रान खान अली शाह खान, कोषाध्यक्ष आलिया कौसर डॉ. मुशिरोद्दिन इनामदार, सदस्य सोफिया अंजुम अली शाह खान, शाफिया अंजुम अली शाह खान यांचा समावेश आहे.




