नरसी नामदेव 33 केव्ही उपकेंद्रावर संतप्त शेतकरी धडकले
हिंगोली (farm pump Power supply) : तालुक्यातील नर्सी नामदेव येथील ३३ के.व्ही. विज केंद्रावरून अनेक गावांना व शेती पंपाला वीज पुरवठा केला जातो. मागील आठ दिवसापासून शेती पंपाला फक्त एक तासच वीज पुरवठा केला जात असल्याने शेतातील उभे पीक वाळून जाण्याच्या मार्गावर असल्याने गुरूवारी संतप्त शेतकरी ३३ के.व्ही केंद्रावर धडकले.
नर्सी नामदेव ३३ के.व्ही. उपकेंद्रातंर्गत सरकळी, ब्रम्हपुरी, देऊळगाव जहागीर, हनवतखेडा, जांभरून जहागीर, गिलोरी या गावांना मागील आठ दिवसापासून कमी दाबाचा विज पुरवठा सुरू आहे. विशेष म्हणजे २४ तासात फक्त ६ तास वीज पुरवठा विद्युत पंपाला देण्यात येत होता. परंतु आठ दिवसापासून फक्त एक तासच (farm pump Power supply) वीज पुरवठा शेती पंपाला दिला जात आहे. त्यामुळे शेतातील हरभरा, हळद, कापूस हे पिक धोक्यात आले आहे.
त्यामुळे या गावातील संतप्त झालेल्या शेतकर्यांनी ३३ के.व्ही. उपकेंद्रावर धाव घेऊन संबंधित कर्मचार्यांना धारेवर धरले. वरिष्ठांचेच आदेश असल्याचे कर्मचार्यांनी सांगितल्याने शेतकर्यांनी वरिष्ठांशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला. त्यावेळी १५ नोव्हेंबरपासून सुरळीत वीज पुरवठा केल्या जाईल असे आश्वासन महावितरणच्या वरिष्ठ अधिकार्यांनी शेतकर्यांना दिल्याने शेतकरी निघून गेले.