Ashti suicide case :- आष्टी तालुक्यातील लहानआर्वी येथील अल्पभूधारक शेतकरी प्रवीण पंजाबराव राऊत (वय ४८) यांनी कर्जफेडीच्या विवंचनेत राहत्या घरी विष प्राशन करून आत्महत्या (suicide)केल्याची दुर्दैवी घटना दि. १२ ऑक्टोबर रोजी रात्री घडली.
सततच्या नापिकीमुळे शेतकऱ्याची आत्महत्या
मिळालेल्या माहितीनुसार, दिवंगत प्रवीण राऊत यांच्याकडे केवळ दीड एकर शेती होती. त्यांनी यंदा सोयाबीन व तूर पिकाची लागवड केली होती. मात्र, सतत पडणाऱ्या पावसामुळे सोयाबीन पीक सडले. पेरणीसाठी नातेवाईकांकडून उसने पैसे घेतले होते, तसेच बँकेचे थकित कर्ज देखील होते. सततच्या नापिकीमुळे आणि आर्थिक अडचणींमुळे प्रवीण राऊत मानसिक नैराश्यात होते. त्यातच गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या पायाला गँगरीन हा गंभीर आजार झाला होता. दैनंदिन मजुरी करून ते वृद्ध आईसह उदरनिर्वाह करत होते. पत्नीने घर सोडल्याने जबाबदारीचे ओझे आणखी वाढले होते. दि. १२ ऑक्टोबरच्या संध्याकाळी त्यांनी आईला शेजारी पाठवून राहत्या घरी विष प्राशन केले.
रात्री नऊच्या सुमारास आई जेवणासाठी बोलवायला गेली असता, प्रवीण तोंडाला फेस आलेल्या अवस्थेत अचेत पडलेले दिसले. शेजाऱ्यांच्या मदतीने त्यांना तातडीने आष्टी ग्रामीण रुग्णालयात(Hospital) नेण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.या घटनेची नोंद आष्टी पोलिस ठाण्यात करण्यात आली असून, पोलीस पुढील तपास करीत आहेत.