परभणी/पाथरी (Parbhani):- पाथरी तालुक्यात खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टी नंतर शेतकऱ्यांना अनुदान स्वरूपात शासनाकडून मदत जाहीर झाल्यानंतर व लाभार्थी शेतकऱ्यांची माहिती महा-आयटी पोर्टलवर अपलोड केल्यानंतर ई -केवायसी (E-KYC) केलेल्या २० हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर २४ कोटी रुपये वर्ग करण्यात आले असून १९ हजार शेतकऱ्यांनी ई – केवायसी केल्यास जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात त्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग होण्याची शक्यता आहे .
१९ हजार शेतकरी ई -केवायसी करणे बाकी
पाथरी तालुक्यामध्ये सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टी (heavy rain) नंतर खरिपातील जिरायती व बागायती क्षेत्रावर असणाऱ्या खरिप पिकांसह फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. शेतकऱ्यांना संकटाच्या काळी मदत म्हणून शासनाकडून एनडीआरएफच्या (NDRF)निकषानुसार मदत घोषित झाली होती. यानंतर तालुक्यातील चारही महसूल मंडळात येणाऱ्या ४८ हजार ७०० लाभार्थी शेतकऱ्यांची माहिती महा-आयटी पोर्टलवर अपलोड करण्याची प्रक्रिया प्रशासनाकडून करण्यात आली. यानंतर प्रसिद्ध करण्यात आलेल्या याद्या मधील शेतकऱ्यांनी सीएससी केंद्रावर जात ई -केवायसी केली. यापैकी २० हजार १५ शेतकऱ्यांना २४ कोटी ५० लाख रुपयांचे अनुदान खात्यावर जमा झाले. तर २८ हजार ६८५ शेतकर्यांना अद्याप अतिवृष्टीचे अनुदान मिळालेले नाही.
जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात उर्वरित अनुदान खात्यावर ?
यासंदर्भात उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी यांना विचारणा केली असता उर्वरित शेतकऱ्यांपैकी ९ हजार ५५४ शेतकऱ्यांनी इ -केवायसी केली असून उर्वरित १९ हजार १३१ शेतकऱ्यांनी ई -केवायसी केल्यानंतर जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये त्यांच्या खात्यावर अनुदान जमा होण्यास सुरुवात होईल अशी माहिती दिली आहे . उर्वरित शेतकऱ्यांनी आपली ई -केवायसी तात्काळ करून घ्यावी असे आवाहनही यावेळी त्यांनी केले आहे .